आता भोसरीतही “बांधकाम बंदी’

पिंपरी – पाणी टंचाईचे काम देत चिंचवड विधानसभा मतदार संघात बांधकामांना परवानगी न देण्याचा फतवा आमदार लक्ष्मण जगताप यांनी काढल्यानंतर आता भोसरीतही त्याची अंमलबजावणी होणार आहे. आमदार महेश लांडगे यांनी नगररचना व बांधकाम परवानगी विभागाची आढावा बैठक घेत आंद्रा-भामा आसखेड धरणातून जोपर्यंत शहरासाठी पाणी येत नाही. तोपर्यंत भोसरी मतदार संघातील नवीन बांधकामांना परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश दिले आहेत.

नगररचना व बांधकाम परवानगी विभागाची आढावा बैठक आमदार लांडगे यांनी घेतली. यामध्ये त्यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीबद्दल नाराजीचा सूर आळवला. आंद्रा-भामा आसखेड धरणातून जोपर्यंत शहरासाठी पाणी येत नाही. तोपर्यंत भोसरी मतदार संघातील नवीन बांधकामांना परवानगी दिली जाऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, मकरंद निकम, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर बैठकीला उपस्थित होते.

-Ads-

आमदार महेश लांडगे म्हणाले, अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. असे असतानाही महापालिकेकडून व्यावसायिकांना सर्व परवानग्या दिल्या जातात. हे अत्यंत चुकीचे आहे. व्यावसायिकाने आश्वासनाची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी करण्याचे काम महापालिकेचे आहे. लोकप्रतिनिधींनी व्यावसायिकाला आश्वासनाच्या पूर्ततेबाबत विचारणा केल्यास त्याच्याकडे पालिकेच्या सर्व परवनाग्या असतात. कोणतीही पाहणी न करता अधिकाऱ्यांकडून ना-हरकत दाखले कसे दिले जातात? असा सवालही त्यांनी केला.

महापालिकेने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याअगोदर सोसायटीपर्यंत जाण्यासाठी महापालिकेचा पक्का रस्ता अथवा खासगी रस्ता असल्यास सोसायटीच्या नावे त्याची कागदपत्रे आहेत का याची तपासणी करावी, बांधकाम पूर्णत्व ते सोसायटीचे हस्तांतरण आणि कमीत कमी पाच वर्षासाठी लागणारा देखभाल खर्च जमा करुन घेण्यात यावा. पुढील दहा वर्षाचे बांधकाम व्यावसायिकाने पाण्याचे नियोजन करावे. तसेच लागणारे टॅंकर, पालिकेकडून मिळालेले कनेक्‍शन याची जबाबदारी, ओला कचरा जिरविण्याचे नियोजन. मोकळी जागा पालिकेकडे हस्तांतरित करुन त्यावर विकास केल्याशिवाय सोसायटी हस्तांतरण करण्यात येऊ नये.

शहानिशा करुनच अग्निशामकचा ना-हरकत दाखला देण्यात यावा. पार्किंग व्यवस्था असणे बंधनकार करणे, पार्किंगशिवाय सदनिका विकण्यास मनाई करण्यात यावी. पार्किंग, मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकामास मनाई करणे. पुढील पाच वर्षाच्या नियोजनानुसार ड्रेनेज व्यवस्था करणे, त्यासाठी लागणारी अद्यावत यंत्रणा उभी करणे. सर्व सोयी-सुविधा मोकळी जागा, पाणी, लाईट, लिफ्ट, ड्रेनेज याची 100 टक्के अंमलबजावणी झाल्यानंतरच लोकांना राहण्यास परवानगी देण्यात यावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बांधकामांची “कुंडली’ मागवली
बैठकीत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरातील बांधकामांची कुंडली मागितली आहे. त्यानुसार, महापालिकेने भोसरीत मतदार संघात गेल्या पाच वर्षात किती बांधकामांना परवानग्या दिल्या आहेत. त्या व्यावसायिकांनी पालिकेच्या अटी-शर्तीचे पालन केले आहे की नाही, याची माहिती देण्याचे निर्देश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती चार दिवसात आयुक्तांना देण्यात येईल. बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकांमधील दिलेल्या नागरिकांना आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही? याची तपासणी केली जाईल. सोयी-सुविधा दिल्या नसतील तर त्यांना नोटीस देण्यात येईल. संबंधित व्यावसायिकाचे नवीन ठिकाणी सुरु असलेले काम बंद केले जाईल. तसेच बांधकाम परवाना रद्द केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)