आता फूल बाजारासाठी नवीन नियमावली

वाहतुक, स्वच्छता, सुरक्षिततेसाठी, सुरळीत व्यापारासाठी ही नियमावली

पुणे – फळे, भाजीपाला विभागानंतर आता समस्या सोडविण्यासाठी फूल बाजारात नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. शेतकरी, आडते आणि बाजार घटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. येत्या गुरूवारपासून (दि. 22 मार्च) या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी केली आहे. या नियमावलीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे फूल बाजारही लवकरच फळ, भाजीपाला विभागाप्रमाणे मोकळा श्‍वास घेईल, अशी अपेक्षा आहे.
फूल बाजारातील कामकाजात सुलभता यावी, यासाठी बाजार समिती प्रशासनाने येथील आडते आणि बाजार घटकांशी चर्चा करून स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतूकीत सुरळीत व्हावी यादॄष्टीने ही नियमावली तयार केली आहे. त्यानुसार, बाजार आवारात दुपारी दीडपर्यंत शेतमालाची विक्री करावी, अनुज्ञाप्तीप्रमाणे एका आडत्यास एक मदतनीस ठेवता येईल, आडत्यांनी एक जागा आणि एक अनुज्ञप्ती याप्रमाणे आत आणि बाहेर एकच हिशोबपट्टी पुस्तक वापरावे, गाळा पुर्ण भरलेनंतरच जादा जागेवर शेतीमाल उतरविण्यात यावा, शेतीमाल उतरविल्यानंतर रिकामी झालेली वाहने हमाल, कामगार, संबंधित आडते यांच्ये कर्तव्यातील कसुरामुळे बाहेर जावू शकले नाही, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, फुलबाजार आवारातील आडत्यांनी त्यांचा माल गाळ्यावरच लावावा, तसेच आखून दिलेल्या पट्ट्याच्या बाहेर किंवा येण्या-जाण्याच्या रस्त्यावर माल ठेवून विक्री करू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, आडत्यांनी 10 फूटांपेक्षा जादा जागेवर माल ठेवून विक्री करून नये, जादा शेतीमाल आवक झाल्यास पहिली गाडी खाली करून मालविक्री झालेनंतरच दुसऱ्या गाडीस प्रवेश दिला जाईल, गाडी वेळेत खाली करण्याची जबाबदारी संबंधित आडते, हमाल आणि कामगार यांची राहील, अन्यथा कायद्यातील तरतूदीचा विचार करून हमाल कामगार नेमणूकीचा बाजार समिती निर्णय घेण्यात येईल. बाजार आवारात नियमांप्रमाणे खरेदी विक्री सुरू झाल्यानंतर गाळ्यासमोर शेतमाल घेवून आलेली वाहने शेतीमाल खाली करून तात्काळ बाहेर काढावीत, सर्व बाजार घटकांनी बाजार आवारातील स्वच्छतागृहाचा (शौचालयाचा) वापर करावा, उघड्यावर लघवी अथवा शौचास बसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, बाजार आवारात कोठेही बेकायदेशीर पार्किंग केलेली आणि वाहतूकीचे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, परवाना नसलेल्या परंतु, गाळ्यावर काम करणाऱ्या कामगारांना आवश्‍यकतेनुसार कायद्यातील तरतूदीचा विचार करून अनुज्ञप्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल, शेतीमाल घेवून येणाऱ्या व्यतिरिक्त खासगी वाहनांना दुपारी 1 वाजल्यानंतर प्रवेश दिला जाईल. बाजार आवारातील वाहन चालकांनी वाहन सोडून अन्यत्र जावू नये, फूलबाजार आवारातील खराब/सडलेला माल, केरकचरा बाजार समितीने दिलेल्या पेटीत टाकून भरलेली पेटी नेमलेल्या कचरा पेटीवर टाकावी, शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी शेतीमालाची मोट 50 किलोपेक्षा जास्त वजनाची बांधू नये. तसेच आडत्यांनी गाळ्यावरील मागील जागा रिकामी ठेवून पुढील जागेत माल लावू नये, आदी 18 प्रकारचे नियम बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)