आता प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता लागू होणार

नगर महापालिकेची लवकरच होणार प्रभाग रचना जाहिर

नगर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचना जाहीर करण्यापासूनच राजकारण्यांचा निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडण्यासाठी ज्या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक पूर्व आदर्श आचारसंहिता लागू केली जाणार आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच, समाजकंटकांची धरपकड, पैसे व मद्य वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे आता नगर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाचा निर्णय महत्वाचा ठरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम प्रशासनाने केले असून 17 प्रभाग राहणार असून त्यासाठी 68 नगरसेवक संख्या निश्‍चित केली आहे. एका प्रभागासाठी 20 हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर केला असून प्रभाग रचना व आरक्षण येत्या 27 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनापासून आचारसंहितेचा निर्णय हा नगर महापालिकेपासून लागू होण्याची शक्‍यता आहे.

आयोगाने अलीकडेच या संदर्भातील भूमिका जाहीर केली असून, त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्यापूर्वीच निवडणूक यंत्रणेकडून प्रभाग रचना, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम केले जाते. अशा वेळी राजकारण्यांकडून वा संबंधितांकडून याकामात हस्तक्षेप होण्याच्या व त्यात प्रामुख्याने निवडणूक विषयक कामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मतदार यादी वा प्रभाग रचना तयार करतानाच पक्षपात केला जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळेच की काय प्रभाग रचनेपासूनच निवडणुकीच्या इच्छुकांकडून निवडणूक जिंकण्याच्या इर्षेने निवडणूक आचारसंहितेचे पावलो पावली उल्लंघन केले जाते, किंबहुना तेव्हापासूनच निवडणूक तयारीला सुरुवात केली जाते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रारंभी मतदार यादीचे काम हाती घेतले जाते. त्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग रचना जाहीर केले जाते, प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे विभाजन केल्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेतले जाते या तिन्ही टप्प्यावर निवडणुकीचे काम पारदर्शी व निष्पक्षपणे व्हावे यासाठी आयोगाने यापुढे मतदार यादीचे काम कर्तव्यदक्ष, निष्पक्ष व सचोटीच्या अधिकाऱ्यांकरवी केले जावे, अशी सूचना केली असून, या कामावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात याव्यात तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या दिनांकास ज्या अधिकाऱ्यांना सध्याच्या पदावर 3 वर्षे पूर्ण होत असतील त्यांना निवडणुकीचे काम दिले जाऊ नये, असेही सुचविण्यात आले आहे.

पैसे, मद्याच्या वाहतुकीवर निर्बंध

प्रभाग रचना जाहीर झाल्यापासूनच समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, दारूबंदी कायद्यान्वये धाडी टाकाव्यात, बॅंका, पतसंस्थांच्या पैशांच्या व्यवहारावर लक्ष ठेवावे, पैसे व मद्याची अवैध वाहतूक रोखावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याच्याही आयोगाने सूचना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)