आता पॅन कार्ड मिळणार काही क्षणात

प्राप्तीकर भरण्यासाठीही सरकारकडून नवे ऍप लवकरच

नवी दिल्ली: आता तुम्हाला तुमचे पॅन कार्ड काही क्षणात मिळणार असून, तुम्ही तुमचा टॅक्‍स मोबाईलच्या माध्यमातून भरु शकणार आहात. कारण अर्थमंत्रालय आणि प्राप्तीकर विभाग करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरच नवे मोबाईल ऍप लॉन्च करणार आहे. तसेच पॅन कार्डही तत्काळ उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रकल्पावर काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. डायरेक्‍टोरेट ऑफ सिस्टीमच्या देखरेखीखाली केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) या दोन्ही उपक्रमांवर काम करत आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
यासाठी सीबीडीटीने आधारच्या ई-केवायसीच्या सुविधेचा वापर करुन, काही क्षणातच पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी सीबीडीटी आणि कॉर्पोरेट मंत्रालयाने एका नव्या कंपनीला केवळ एका अर्जच्या माध्यमातून चार तासांच्या आत पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी करार केला आहे. जर ई-केवायसीच्या माध्यमातून सिमकार्ड देता येऊ शकते, तर त्याचमाध्यमातून पॅन कार्डही देता येऊ शकतं. त्यामुळं सध्या ज्या व्यक्तीला पॅन कार्ड मिळण्यासाठी दोन ते तीन आठवड्याचा कालावधी लागत होता. ते काम तत्काळ पूर्ण होत असल्याने पाच ते सहा मिनिटात त्या व्यक्तीला पॅन कार्ड उपलब्ध करुन देणे शक्‍य होणार असल्याचे एका संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. याशिवाय प्राप्तीकर विभाग एक नवे स्मार्टफोन ऍप ही विकसित करत असून, याच्या माध्यमातून ऑनलाईन टॅक्‍स भरण्याच्या प्रक्रियेला हातभार लागणार आहे. या नव्या ऍपमध्ये पॅन कार्डसाठी तुम्हाला अर्ज करणे, आपल्या प्राप्तीकराच्या विवरणपत्राची ताजी माहिती मिळवणे आदी सर्व या ऍपवर उपलब्ध असेल. दरम्यान, प्राप्तीकर विभाग आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध करुन देत असलं, तरी या ऍपच्या माध्यमातून या सुविधांमध्ये भरच पडणार असल्याचे आयकर विभागचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)