आता ट्रॅव्हल्स आरटीओच्या रडारवर

– 47 ट्रॅव्हल्सला दणका, वाहने अडकवून ठेवली
– सहा वायुवेग पथकांची धडाकेबाज कामगिरी
– फिटनेस, टॅक्‍स, जादा प्रवासी वाहतूक तपासणी करणार

 
पुणे – अनफिट आणि अन्य नियम न पाळणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओने कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे अशा गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही वेळेत न पोहोचण्याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत अशा वाहनांतून प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोळीबार मैदानाजवळ गुरूवारी रात्री 12 वाजता पुणे-सांगोला दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकाने करपावती भरण्यासाठी गाडी थांबवली. तेवढ्यात आरटीओच्या “वायुवेग पथका’तील मोटार वाहन निरीक्षक ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश करून प्रवाशांची संख्या मोजली. क्षमतेपेक्षा जादा प्रवासी आढळून आल्याने संबंधित चालकाला गोळीबार मैदानावर वाहन नेण्यास सांगितले. ट्रॅव्हल्सचे फिटनेस नसणे, टॅक्‍स नसल्यामुळे वाहनाला पुढे जाण्याला अधिकाऱ्यांनी अटकाव केला. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी स्वारगेट एसटी स्थानकातून एसटी बोलावून प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्याला मदत केली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 6 वायुवेग पथकांकडून बेशिस्त आणि नियमबाह्य ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरूवारी वायुवेग पथकाच्या धडक कारवाईत 47 वाहनांचा अटकाव करण्यात आला आहे. शहरातील सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, नाशिक आणि मुंबई रस्ता दरम्यान बस तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये बहुतांश ट्रॅव्हल्स चालकांनी टॅक्‍स न भरणे, जादा प्रवाशांची वाहतूक करणे, बसचे फिटनेस न केल्याचे तपासणीतून आढळून आले आहे. त्यानुसार संबंधित ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, आनंद पाटील, चंद्रशेखर चव्हाण यांनी वायुवेग पथकाद्वारे बेशिस्त ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई केली.

मोटार वाहन कायद्यानुसार ट्रॅव्हल्सचे फिटनेस नसणे, जादा प्रवाशांची वाहतूक करणे, टॅक्‍स जमा न केल्यामुळे सहा वायुवेग पथकांद्वारे गुरूवारी 118 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 47 ट्रॅव्हल्सचा अटकाव करण्यात आला आहे. धडक मोहिमेतील कारवाईमुळे सर्वाधिक बेशिस्त ट्रॅव्हल्सचालकांना धडा शिकविण्यात आला आहे. दंडवसुली केल्याशिवाय संबंधित बसेसची सुटका केली जाणार नाही. 

– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)