आता टीव्ही पाहणाऱ्या लोकांवरही राहणार सरकारची नजर

नवी दिल्ली: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्हीच्या सेट टॉप बॉक्समध्ये एक चीप लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रेक्षक किती वेळ कोणते चॅनल पाहतात, याची माहिती चीपमधून मिळू शकणार आहे. चॅनल पाहणाऱ्या लोकांची नेमकी आकडेवारी गोळा करण्यासाठी सेट टॉप बॉक्समध्ये चीप बसवण्यात येणार आहे. यामुळे जाहिरातदारांना मदत होईल, असे सरकारला वाटते.

‘डीटीएच ऑपरेटर्सना नव्या सेट टॉप बॉक्समध्ये चीप लावण्यास सांगितले जाईल. या चीपमध्ये प्रेक्षक कोणते चॅनल पाहतात आणि ते नेमके कोणत्या वेळेत पाहतात, याची माहिती गोळा होईल,’ असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्या प्रस्तावात म्हटले आहे. डीटीएच परवान्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर ट्रायने शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चीपबद्दलचा प्रस्ताव दिला.

दूरदर्शनची प्रेक्षक संख्या नेहमी कमी दाखवली जाते, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला वाटते. खुद्द याच मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हा आक्षेप बोलावून दाखवला. सेट टॉप बॉक्समध्ये चिप लावल्यावर प्रेक्षकांचा खराखुरा आकडा मिळू शकेल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. यामुळे देशातील ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिल इंडियाची (बार्क) मक्तेदारी संपुष्टात येईल. ‘सध्या देशात बार्कला कोणताही पर्याय नाही. बार्क कुठून आकडेवारी गोळा करते, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, कोणत्या भागातून आकडेवारी जमा केली जाते, याबद्दलची कोणतीही माहिती सांगितली जात नाही’, असंही या अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)