आता जिल्ह्याचे वाटोळे करायचे का?- अनिल राठोड

अनिल राठोड यांचे आमदार जगताप यांच्यावर भाजप-शिवसेना मित्रपक्षाच्या मेळाव्यातून टीकास्त्र

नगर, दि. 26 (प्रतिनिधी) – “नगरचे साडेचार वर्षात देशपातळीवर यांनी नाव खराब केले आहे. नगरचे जे वाटोळे झाले आहे, ते आता जिल्ह्याचे करायचे का? मुळापासून उपचार करण्याची भाषा करणे म्हणजे मारून टाकणे! शिवसेनेने दोन शिवसैनिक गमावले आहेत. हे शिवसेना कधी विसरणार नाही. ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे सुरक्षित, संयमशील आणि देशाला मजबूत करणाराच उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पाठवणार असून, नगर शहरातून सर्वाधिक मताधिक्‍य देऊ,’ असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये भाजप, शिवसेवा व मित्रपक्षा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात उपनेते अनिल राठोड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे अध्यक्षस्थानी होते.

उपनेते राठोड म्हणाले, “भाजप-शिवसेना व त्यांच्या मित्रपक्षाने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने लोकसभेसाठी संयमी उमेदवार दिला आहे. त्यांच्याविरोधात दिलेल्या उमेदवार पाहिल्यास हे सांगण्याची गरज नाही. नगरचे नाव या उमेदवाराने देशपातळीवर केले आहे. कार्यकर्त्यांनी काम करताना कुणाचीही भीती बाळगू नये. हे फक्त फोन करून दम देतात. यांचे उद्योग काय आहेत, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आपण स्वतः उमेदवार आहोत, असे समजून काम करा.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. सुजय विखे यांना निवडून आणायचे आहे. यासाठीच हा संकल्प मेळावा आहे, असे सांगत नगर शहरातून विखेंना सर्वाधिक मताधिक्‍य मिळेल असा दावा राठोड यांनी केला.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीतील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीवरूनही त्यांनी फटकेबाजी केली. शहराचे राजकारच बदलले आहे. आपल्या सगळ्यांची ही कमाल आहे. मनपाची सत्ता शिवसेनेला देण्याची नगरकर यांची इच्छा होती. शिवसेनेचे 24 नगरसेवकही निवडून आले. “आता तरी युती करा,’ अशा शब्दात पालकमंत्री राम शिंदे यांना उद्देशून त्यांनी मनपात युती करण्याची मागणी केली.

महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर, ब्रिजलाल सारडा, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी अशोक खेडकर, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, बाळासाहेब महाडीक, नामदेव राऊत, आशा निंबाळकर, रामदास भोर, प्रदीप पेशावर, विक्रम तांबे, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

कर्डिलेंसमोर शिवसेना नगरसेवकांची फटकेबाजी!

शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी मेळाव्यात बोलतांना आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासमोरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यावर निषाणा साधला. “मी कुणाला घाबरत नाही म्हणून थेट बोलतोय,’ असे म्हणतच त्यांनी भाषणाची सुरुवात केली. शहरात विकास व संरक्षण या मुद्यावर निवडणुका होतात. विरोधी उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावरच भाजपला पाठिंबा दिलेला आहे. केडगावची पोट निवडणूक सर्वांनीच पाहिली आहे. संरक्षणासाठी व दहशत मोडून काढण्यासाठी सुजय विखे सक्षम आहेत. त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी काहीच नसल्याने उत्तर-दक्षिण वाद घातला जात आहे. सुजय यांची गाडी दक्षिणमध्ये त्यांचे आजोबा खासदारसाहेब बाळासाहेब विखे पाटील यांच्या रुपाने कधीच आली आहे आणि ती रोखू शकत नाही, असाही गाडे यांनी आमदार जगताप यांना टोला मारला. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी देखील आमदार संग्राम जगताप यांच्यावर टिका केली. “सिंधू यांच्या रुपाने जिल्ह्यातील चांगला पोलीस अधीक्षक आला आहे. त्यांच्यासमोर या सर्वांचेच म्याव झाले आहे,’ असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)