फर्ग्युसन प्रकरणानंतर पुन्हा चर्चा : दोन संघटना आमने-सामने

पुणे – शासकीय परिपत्रकानुसार, “शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक सण व उत्सव साजरे केले जाऊ नयेत,’ असे आदेश आहेत. त्यानंतरही फर्ग्युसन महाविद्यालयात घातलेली सत्यनारायण पूजा वादात सापडली. तो वाद थंड होतो न होतो तर आता आबासाहेब गरवारे महाविद्यालयातही बुधवारी सत्यनारायण पूजा घालण्यात आली. यामध्ये परस्परविरोधी विचारधारेच्या दोन संघटना आमने-सामने आल्या व घोषणाबाजी झाली.

शासनाने दि. 4 जानेवारी 2017 रोजी काढलेल्या पत्रात “शैक्षणिक संस्थामधील धार्मिक कार्यक्रम हे संविधानाच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहेत,’ असे म्हटले होते. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये देवी-देवतांचे फोटोही लावू नयेत, तसेच कोणते धार्मिक विधीही केले जाऊ नयेत, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत. तरीही फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा घालण्यात आली होती. याला काही संघटनांनी विरोध केला होता. हाच प्रकार पुन्हा एकदा आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घडलेला दिसून आला.

याबाबत माहिती देताना गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्या मुक्‍तजा मठकरी म्हणाल्या, “ही पूजा महाविद्यालयाने नसून तेथील कर्मचाऱ्यांनी घातली आहे. यासाठी संस्थेचा कोणताही पैसा खर्च केलेला नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचा कोणताही सहभाग नाही.’
तर, लोकतांत्रिक जनता दलाचे सरचिटणीस कुलदीप आंबेकर म्हणाले, “शासनाचे आदेश असतानाही एकावर एक अनेक संस्था अशा प्रकारे हा नियम मोडित काढत आहेत. याबाबत दोन दिवस आधीच मी प्राचार्या मठकरी यांना अशा प्रकारे पूजेला परवानगी देणे नियमबाह्य असल्याचे लक्षात आणून दिले होते. तरीदेखील ही परवानगी देण्यात आली आहे. संविधानाच्या नियमांची पायमल्ली करण्याचा हा प्रकार आहे.’

या निर्णय सर्वस्वी संस्थेचे पदाधिकारी सचिन आंबर्डेकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार घेतला आहे. या पूजेची कोणतीही नोटीस लावलेली नव्हती. हा कर्मचारी वर्गाचा भाग असून शैक्षणिक संस्थेची त्यांनी केवळ जागा वापरली आहे.
– मुक्‍तजा मठकरी, प्राचार्या, आबासाहेब गरवारे महाविद्यालय


फर्ग्युसन महाविद्यालयतसेच गरवारे महाविद्यालयात झालेली सत्यनारायण पूजा ही शासकीय परिपत्रकानुसार चुकीची आहे की नाही, याबाबत माहिती घेतली जाईल. त्यानुसार कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.
– डॉ. विजय नारखेडे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)