आता खाली मान घालून जगा

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
गैरफायदा घेतात काहीजण
भुंकणाऱ्या काही श्‍वानांपुढे
तुकडे फेकणारे नेते कोण

स्वतः पडद्याआड राहूनच
पुढारी हलवितात सारी सुत्रं
कार्यकर्त्यांनो ओरडत रहा
ऐशोआरामात जगतात राजपुत्र

वर्षानुवर्षे सत्ता राबविणाऱ्यांचे पित्ते
सत्ता गेल्यावर लागले बोलायला
ज्यांना कवडीची अक्कल नाही
लागले नाकाने कांदे सोलायला

काही उपटसुंभ उत्साही पुढारी
पत्रकबाजीत आहेत मग्न
समाजाला तर जाऊदेच
घरच्यांनाही कठीण केलय जगणं

जातीधर्माच्या आधारावरच
अनेकांचे नेतेपण टिकलेले
स्वजातीच्या मानगुटीवर बसतात
काही अतिहुषार नेते शिकलेले

प्रसिद्धीची हौस असल्यामुळे
कार्य न करताही होतात नेते
अनेकांचा स्वतःबद्दल गैरसमज
अशा बावळटांची किवच येते

एकिकडे स्वच्छ प्रतिमेचे नेते
दुसरीकडे सत्तांधांची फौज
अनेक पोटभरू स्वार्थाधांना
आज करता येत नाही मौज

स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना
भ्रष्ट नेते करत नाहीत सहन
का पोरकटपणाभोवती वलय
हा प्रश्‍नच आहे अतिशय गहन

वर्षानुवर्षे लुटमार करणाऱ्यांनो
काम करणाऱ्यास काम करू द्या
तुमचे एकच धोरण असायचे
तुम्हीही खा अन्‌ मलाही चरू द्या

आक्रमक टीका करणाऱ्यांनो
तुमच्या नेत्यांचा इतिहास बघा
सत्तारुढ असताना केली मस्ती
आता खाली मान घालून जगा

   -विजय वहाडणे

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)