आता उत्सुकता प्राधिकरण सदस्य निवडीची

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव थाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची “पीसीएनटीडीए’वर नियुक्ती करण्यासाठी इच्छुकांच्या वरिष्ठांकडे फेऱ्या वाढल्या आहेत.

नियोजनबध्द व सर्वांगिण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च 1972 मध्ये स्थापना झालेली आहे. तेव्हापासून या परिसरातील नागरिकांना घरे, प्लॉट, सोसायटी मधील फ्लॅट, गाळे, व्यापारी भूखंड, व्यापारी गाळे देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढलेली आहे. चौदा वर्षानंतर प्राधिकरणाला भाजपच्या राजवटीत अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे प्राधिकरणाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

प्राधिकरणाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. नवनगर विकास प्राधिकरणाच्या काही क्षेत्रामध्येच 12.50 टक्के भूमिपुत्रांचा परताव्याच्या प्रश्न, संरक्षित क्षेत्र, रेडझोन, अनधिकृत बांधकामे, हस्तांतरण, बक्षीस पत्रावर केलेले व्यवहार असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच या भागातील विकास कामे करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेली चौदा वर्षांपासून या विशेष प्राधिकरणाचा प्रशासनाच्या हाती कारभार होता. बाबासाहेब तापकीर यांच्यानंतर प्रथमच सदाशिव खाडे यांना या पदावर संधी मिळाली आहे.

दोन नगरसेवकांसह सात सदस्यांना संधी
प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची निवड झाल्यानंतर अन्य सात सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यामध्ये दोन लोकप्रतिनिधी व अन्य पाच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे महापालिकेत कोणतेही पद न मिळालेल्या दोन नगरसेवकांची प्राधिकरणावर वर्णी लागणार आहे. याशिवाय अन्य पाच कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने अनेकांनी यासाठी “लॉबिंग’ सुरु केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)