आतापर्यंत रब्बीची अवघी 42 टक्‍के पेरणी

नगर – यंदा पावसाने ओढ दिल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. यंदा रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात अवघी 42 टक्के पीकपेरणी झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पेरणी करण्याचे टाळले आहे. पावसाअभावी खरीप वाया गेला तसाच रब्बी हंगामही वाया चालला आहे. सरासरी 6 लाख 67 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी अवघ्या 2 लाख 78 हजार हेक्‍टरवर पेरणी करण्यात आली आहे.

रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. परतीच्या पावसावर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यात रब्बी हंगामातील सर्वाधिक पेरणी ही ज्वारी पिकाची होत असते. नगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील ज्वारी राज्यात प्रसिध्द आहे. ज्वारीनंतर हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र जिल्ह्यात लक्षणीय आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात रब्बी हंगामात कांदा लागवड वाढली आहे.विशेष करून यात लाल कांद्याचे प्रमाण अधिक आहे.

-Ads-

गोकुळ अष्टमीपासून जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला सुरूवात झाली. रब्बी हंगामासाठी आवश्‍यक खते, बियाणे आणि किटक नाशकांच्या नोंदणीसाठी बैठक घेत कृषी विभागाने हंगामाचे नियोजन केले. जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. 4 लाख 69 हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी होण्याची शक्‍यता होती. त्यापैकी 1 लाख 46 हजार 768 हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. रक्षाबंधनानंतर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर वाढत असतो. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. सप्टेंबरमध्ये ज्वारीची पेरणी सुरू झाल्यावर जिल्ह्यात गहू, हरभरा पिकांची पेरणीसाठी नोव्हेंबर- डिसेंबरपर्यंत कालावधी असतो.

दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीत कपात केल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. 7 हजार 39 हेक्‍टरवर गहू, 2 हजार 755 हेक्‍टरवर मका, 44 हेक्‍टरवर इतर तृणधान्य, 16 हजार 132 हेक्‍टरवर हरभरा, 40 हजार 537 हेक्‍टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. 19 हजार 998 हेक्‍टरवर चारा पिके, 38 हजार 596 हेक्‍टरवर कांदा, 2095 हेक्‍टरवर भाजीपाला पिके, 11 हेक्‍टरवर मसाला पिके, 201 हेक्‍टरवर फुलपिके तर, 3 हजार 920 हेक्‍टरवर फळपिकांची लागवड करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)