आताचा दुष्काळ भविष्यातील आपत्तीची चाहूल

प्रभाकर देशमुख: पाणी पुरवठा, चारा लागवडीची आतापासून तयारी हवी

सातारा,दि.27 प्रतिनिधी- राज्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्‍यांमध्ये पडलेला दुष्काळा हा येत्या काळातील आपत्तीची चाहूल आहे. भविष्यात दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आतापासून चारा लागवड व पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू करणे गरजेचे असल्याचे मत माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, येत्या काळात दुष्काळा सामोरे जाताना मनुष्यांसह जनावरांना पाणी द्यावे लागणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्याचे काम अत्तापासून केल्यास योग्य पध्दतीने पाणीपुरवठा करता येणार आहे. त्याचबरोबर दुष्काळजन्य तालुक्‍यांमध्ये ज्या ठिकाणी थोडा फार पाऊस झाला आहे त्या ठिकाणी अथवा शेजारील तालुक्‍यांमध्ये चारा लागवड हाती घेणे आवश्‍यक आहे. चाऱ्याची लागवड आतापासून केल्यास सरकारला सहजरित्या चारा पुरवठा करता येईल व त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न जरी मिळू शकले नाही तरी किमान दुधाच्या विक्रीतून उदरनिर्वाह करता येणार आहे. त्याचबरोबर भविष्यात जनावरांची होणारी विक्री देखील टाळता येणार आहे. असे सांगून देशमुख म्हणाले, सरकारने शासन निर्णयाव्दारे राज्यातील 180 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ सदृश्‍य स्थिती जाहीर केली मात्र, त्यामध्ये खटाव तालुक्‍याचा समावेश करण्यात आलेला नाही. सरकारने खटावसह राज्यातील अन्य तालुक्‍यांचा समावेश न करण्यामागे जे निकष लावले आहेत. त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यापैकी मंडलनिहाय पर्जन्यमान ग्राह्य न धरता संपुर्ण तालुक्‍यात पडलेला एकूण पावसाचा निकष लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सरकारने दुष्काळाबाबत निर्णय घेण्या अगोदर ग्रामस्तरावरील स्थितीची माहिती तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह संपुर्ण प्रशासनाकडून घेणे आवश्‍यक होते. यापुर्वी पडलेल्या दुष्काळावेळी मी विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असताना तशा प्रकारे माहिती घेवून निर्णय घेण्यात येत होती. त्यामुळे सरकारने प्रशासनाने मत विचारात घेवून शासन निर्णयांमधील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे असे देशमुख यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जलयुक्त शिवार योजना यशस्वीच
राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यामागे कृषी आयुक्तपदी कार्यरत असताना प्रभाकर देशमुख यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 180 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ पडल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेसाठी सरकारने खर्च केलेला निधी व योजना यशस्वितेबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. याबाबत पत्रकारांनी देशमुख यांना विचारले असता त्यांनी जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा दावा केला. त्यांनी यावेळी माण तालुक्‍यातील कारखेल गावचे उदाहरण देताना म्हणाले, या गावात जलयुक्त शिवारची कामे भरीव पध्दतीने झाले व त्या ठीकाणी केवळ 30 टक्के पाऊस झाल्यानंतर तेथील बंधारे, विहीरी भरल्या होत्या. त्याचबरोबर तेथील शेतकऱ्यांनी अडीच कोटी रूपयांपर्यंत कृषी उत्पन्न देखील घेतले होते. तसेच जलयुक्त शिवारची कामे झालेल्या प्रातिनिधीक 25 गावांमध्ये किमान 50 टक्के जरी पाऊस पडला तरी त्या ठीकाणी टॅंकरची आवश्‍यकता भासणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)