आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे तीन दिवसात एक हजार इच्छुकांची नोंदणी

कराड : येथील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनातील आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्टॉलवर युवकांची झालेली गर्दी.

यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात मराठा युवकांसाठी विशेष सोय ; दोन महिन्यात 63 प्रकरणे मंजूर

कराड, दि. 26 (प्रतिनिधी) – मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून महामंडळाकडून कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. तसेच व्यवसायासाठी व्याज परतावा अर्थात बिनव्याजी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोन महिन्यात एकूण 63 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कराड येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनातही महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला असून तेथे तीन दिवसात एक हजार मराठा इच्छुक युवकांची नोंदणी झाली आहे. तर वीस जणांना महामंडळाकडून पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक राहुल यादव यांनी दिली.
मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत व्याज परताव्याच्या दोन योजनांसह शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शेतीविषयक तंत्रकौशल्य प्रशिक्षणाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या अंमलबजावणीतून उद्योजक तयार होऊन त्यातून रोजगार निर्मितीस मोठी मदत होत आहे. त्या अनुषंगाने कौशल्य विकासाच्या या कार्यक्रमांतर्गत सुमारे अडीच लाख तरूणांना कृषीविषयक व इतर अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महामंडळाकडून पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.
याच उद्देशाने कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर ज्यांची महामंडळाद्वारे कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत अशा लोकांची व्हिडीओद्वारे माहिती दाखवली जात आहे. त्याचबरोबर ज्या मराठा युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करावयाचा आहे अशा लोकांची नावनोंदणी करून महामंडळाचा अर्ज भरून घेतला जात आहे. तसेच तेथे येणार्‍या प्रत्येकाला योजनांची पुरेपूर माहिती देण्यात येत असल्याने युवकांची स्टॉलवर गर्दी होत आहे. वैयक्तिक, महिला बचत गट व आत्मा विभागाच्या शेतकरी गटांना या योजनांद्वारे सहकार्य केले जाणार आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 10 लाखापर्यंत वैयक्तिक व्याज परतावा दिला जाणार आहे. यामध्ये सुरू असलेला व्यवसाय अथवा शेतीपूरक उद्योगांसाठी लाभ घेता येणार आहे. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाखापर्यंत महिला बचतगट, भागिदारी संस्था, सहकारी संस्थांना याचा लाभ घेता येणार आहे. तर गट प्रकल्प कर्ज योजनेंतर्गत शेती उत्पादक कंपन्यांनी सभासदांना शेतकर्‍यांच्या उत्पादनास योग्य बाजारपेठ, खते, बी-बियाणे, शेती औषधे, कृषी उपाययोजना या सेवा देण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाकडून दहा लाख रूपयांचे सात वर्षासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागात स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)