आणि तिच्या डोक्‍यावर पडल्या अक्षदा!

“शिवक्रांती प्रतिष्ठान’चा शेळकेंच्या मुलीच्या विवाहास मदतीचा हात
– वडील आत्माराम शेळके यांनी गेल्या महिन्यात केली आत्महत्या
– सामाजिक संस्थांसाठी एक नवा आदर्श

मोरगाव, दि. 21 (वार्ताहर) – जवळ आलेले मुलीचे लग्न… सोबत कर्जाचा डोंगर… या विवंचनेत असलेल्या आत्माराम ज्ञानदेव शेळके यांनी मागील महिन्यात 12 मार्चला गळफास घेऊन आत्महत्याव केली होती. यामुळे शेळके कुटंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र बारामतीमधील शिवक्रांती प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे केला शेळके यांच्या कन्येच्या लग्न सोहळा धुमधडाक्‍यात पार पडला. या निमित्ताने शिवक्रांती प्रतिष्ठानच्या युवक मंडळींनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहेच. इतर सामाजिक संस्थांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरणार आहे.
बारामती तालुक्‍यातील तरडोली येथील आत्महत्याग्रस्त आत्माराम शेळके यांची मुलगी मोनिका व पवारवाडी येथीलच आप्पासाहेब पवार यांचा मुलगा विकास यांचा विवाह पवारवाडी येथील सिद्धेश्‍वर मंदिरासमोर संपन्न झाला.या लग्न सोहळ्यासाठी शिवक्रांती प्रतीष्ठानच्या वतीने मांडव दिवाण, संसारपयोगी प्रत्येकी पाच पाच भांड्यांचा संच, पिण्याचे पाणी, पत्रावळी आदी खर्च लग्नासाठी केला असून, लग्न दिमाखात पार पाडले. अगदी जेवणाचा खर्च व अन्न तयार करण्यासाठी आचारीही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला होता. प्रतीष्ठानने केलेल्या या खर्चामुळे शेळके कुटुंबियांच्या भावनांचा बांध मात्र फुटला.
या घटनेमुळे शेळके यांच्या नातेवाइकांनी कुलर, फ्रिज, सोफा आदी वस्तू मोनिकाच्या लग्नानिमित्त आंदण केल्या.समाजातील अशा संस्था पुढे आल्यास राज्यात एकही आत्महत्या होणार नाहीत, असे मत मुलीचे चुलते रावसाहेब शेळके आणि मुलीची आई आनंदाबाई यांनी व्यक्‍त केले.
लग्न सोहळयासाठी जि. प. सदस्य रोहित पवार, शरयु फाउंडेशनच्या शर्मिला पवार, सनी देवकात, तरडोलीच्या सरपंच गौरी शिंदे, उपसरपंच संजय भापकर, राष्ट्रवादीचे हनुमंत भापकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. भविष्यात कुठल्याही संकटाचा सामना करावा लगला तर मदतीसाठी एक थोरला भाऊ या नात्याने मला फोन करा, अशी भावूक हाक या सोहळ्याप्रसंगी रोहित पवार यांनी घातली, तर संबधित शेळके परिवाराच्या मदतीसाठी मी सदैव तयार आहे, असे शर्मिला पवार यांनी कुंटुंबियांना धीर देऊन सांगीतले. लग्नानंतर शर्मिला पवार यांनी दहा हजार रुपयांची मदत शेळके परीवाराला केली

आयुष्याचा साथीदार शोधल्यानंतर समाजातील तरुण मुलांनी लग्नात कुठलीही अपेक्षा न धरता बिगर हुंडा लग्न केल्यास बारामती तालुक्‍यातच नाही, तर संपूर्ण राज्यात मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या नक्कीच थांबतील.
– विकास आप्पासाहेब पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)