…आणि उलगडले “परफॉर्मर पुलं’

बालगंधर्व कलादालनात रंगला परिसंवाद

पुणे – एका व्यासपीठावर दिग्गज मान्यवर.. भोवती पुलंच्या साहित्यावर आधारित व्यंगचित्रे.. पुलंच्या आठवणींना दिलेला उजाळा.. सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची मान्यवरांनी खास शैलीत दिलेली उत्तरे.. रसिकांनी दिलेली दाद.. “तुझे आहे तुजपाशी’ चे वाचन आणि त्यातून उलगडलेले पु.ल.देशपांडे, असे वातावरण होते बालगंधर्व कलादालनामध्ये.

निमित्त होते पुलोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या “परफॉर्मर पुलं’ या परिसंवादाचे. यामध्ये डॉ. मोहन आगाशे, रामदास फुटाणे, फैय्याज आणि दिलीप प्रभावळकर सहभागी झाले होते. परिसंवादापूर्वी मोहन वाघ यांची निर्मिती असलेला “कवितांजली’ हा लघुपट दाखवण्यात आला.

जर्मन नाटकाला अतिशय उत्तमपणे पुलंनी मराठीमध्ये आणले. “तीन पैशांचा तमाशाश या नाटकाच्या निमित्ताने मला पुलंचा सहवास लाभला. आम्ही या नाटकाचे दीडशे प्रयोग केले. एखाद्या कलाकृतीसाठी खरा कलावंत किती झपाटून काम करतो याचा प्रत्यय पुलंमुळे आला, असे “तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाची आठवण सांगताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले.

आपल्या कलागुणांचा रसिकांनी आनंद घ्यावा, अशी पुलंची धारणा होती. कला क्षेत्रातील नवोदितांना पुलंनी कायमच मदत केली. विविध क्षेत्रात संचार असलेले पुल परफॉर्मर म्हणून उत्तमच होते, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. दिलीप प्रभावळकर यांनी “तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील काही उतारे वाचून दाखविले आणि सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना खास शैलीत उत्तरे देत परफॉर्मर पुलंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

“साहित्यिक असलेल्या पुलं सर्वच क्षेत्रात पारंगत होते. विविध विषयांवर आग्रही भूमिका घेण्याचे आम्ही पुलंकडून शिकलो. “आहे मनोहर तरीही’ या पुस्तकावर मी मॉरीशसमध्ये एका कार्यक्रमात वात्रटिकेच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आणि त्याचे रेकॉर्ड पुलंपर्यंत पोहोचली, ती पोहोचू नये अशी माझी इच्छा होती. पण त्यानंतरही सुनिता बाईं आणि पुलंनी मला मोठ्या मनाने माफ केले. ते दोघे किती निस्सीमपणे आपले काम करतात आणि मोठ्या मनाने लहानांना माफ करतात याचा प्रत्यय मला आला,’ असे रामदास फुटाणे म्हणाले.

नाटकाच्या वेळा, योग्य कपडे, भरपूर प्रॅक्‍टिस अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत पुलं आणि सुनीताबाई दोघेही खूप शिस्तीचे होते. काही कालावधीनंतर होणाऱ्या प्रयोगाच्या आधीही प्रॅक्‍टिस झाली पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा एकदा अमिताभ आणि जया बच्चन प्रयोगाला येणार होते. त्यावेळीही पार्किंगच्या अभावाने त्यांनी लांब गाडी आणू नये, वेळेच्या आधी येऊन स्थानापन्न व्हावे या सुनीताबाईंच्या सुचनांचे त्यांनीही पालन केले होते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या, नवख्या कलाकारांचे बोट धरून त्यांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम या दोघांनी केले. अशाच एका मैफलीच्या निमित्ताने वसंतराव, पुलं आणि बेगम अख्तर यांच्यातील एक बिंदू होण्याचे भाग्य मला मिळाले, असे फैय्याज यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)