आणखी 700 जुन्या बस धावणार रस्त्यावर?

पीएमपीएमएल निर्णय घेण्याच्या तयारीत


आरटीओच्या नाकावर टिच्चून पाऊल

पुणे- अपयश झाकण्यासाठी बाद झालेल्या तब्बल पावणेसातशे बस मार्गावर पाठविण्याचा निर्णय पीएमपीकडून घेतला जाणार आहे. यातूनच प्रशासन लाखो प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. त्याशिवाय बसेसला आगी लागण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अक्षरश: खिळखिळी झाली आहे. तर खासगी वाहतुकीला सोन्याचे दिवस आले आहेत.

सध्या असलेल्या बसेस या कमी आहेत. प्रवाशांची मागणी आणि उपलब्ध बसेस यामध्ये तफावत असल्याने प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होत आहेत. मात्र, आता लवकरच दोनशे बसेस येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.
नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

पीएमपी ताफ्यात सध्या 750 बसेस या 15 वर्षांपेक्षा जुन्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा बसेस मार्गावर पाठविण्याचा धोका पत्करता येत नाही. पण, महसुलाचा ताळमेळ साधण्यासाठी या बसेस मार्गावर पाठविण्याचा खटाटोप प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रवासी संघटनांनी याबाबत आवाज उठविला होता. त्याची दखल घेऊन या बसेस मार्गावर पाठविल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा आरटीओने दिला होता. गेल्या सहा ते सात महिन्यांत आरटीओच्या नाकावर टिच्चून या बसेस मार्गावर धावत असून एकाही बसवर आतापर्यंत दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केला.

फायद्यातील मार्गांनाही कात्री…!
मनपा-तळेगांव ढमढरे, कात्रज-निगडी, मनपा- भोसरी, स्वारगेट- सासवड, स्वारगेट- कात्रज यासह आणखी सर्वाधिक फायद्याचे मार्ग आहेत. या मार्गावर दर 10 मिनिटांना बस दिली तरी या मार्गावरील प्रवाशांची गर्दी ही कायम असते. मात्र, या मार्गावर जादा बसेस देण्यास कुचराई करण्यात येते. त्यामुळेच प्रशासनाच्या महसूलात दिवसेंदिवस लक्षणीय घट होत चालली आहे, असा आरोप पीएमटी कामगार संघाचे (इंटक) उपाध्यक्ष अशोकराव जगताप यांनी केला.

बिघाडाचे प्रमाण रोखणार कोण?
पीएमपीएमएलच्या बसेसमधून दररोज किमान बारा ते तेरा लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यातूनच प्रशासनाला दररोज किमान पावणेदोन ते दोन कोटी रुपयांचा महसूल मिळत असतो, सणासुदीच्या अथवा लगीनसराईच्या कालावधीत हाच महसूल सव्वादोन कोटी रुपयांच्याही पुढे जातो. हा महसूल दररोज मिळत असल्याने आणि त्यातून स्पेअरपार्ट खरेदी करणे शक्‍य असल्याने बिघाडाचे प्रमाण रोखणे सहज शक्‍य आहे, तरीही रस्त्यावर बस बंद पडण्याचा टक्का हा दररोज किमान तीस ते चाळीस असाच आहे.

डॉ. श्रीकर परदेशी पॅटर्नच हवा
पीएमपीएमएल डबघाईला आल्यानंतर यापूर्वी डॉ. श्रीकर परदेशी यांनी अल्पावधीतच कामात आणि कारभारातही सुसूत्रता आणत लोकाभिमुख सेवा दिली. त्यामुळेच मार्गावर बस बंद पडण्याच्या प्रमाणात प्रचंड घट झाली. त्याशिवाय प्रशासन काही प्रमाणात नफ्यातही आले होते. मात्र, त्यांची अल्पावधीतच बदली करण्यात आली आणि पीएमपीएमएल पुन्हा पोरके झाले. त्यामुळे पीएमपीएमएलचा गाडा रुळावर आणायचा असेल तर “डॉ. श्रीकर परदेशी’ पॅटर्नच’ राबवायला हवा, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)