आणखी दुरवस्था होण्यापुर्वीच उद्‌घाटन करण्याची गरज

राजकीय अन्‌ सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवायला हवा

सम्राट गायकवाड
सातारा – उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या परिसराची दुरवस्था होत असून आणखी दुरवस्था होण्यापूर्वीच प्रशासनाने उद्‌घाटन करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. मात्र, त्या दृष्टीने प्रशासनाला फारसे गांभीर्य नसल्यामुळे आता सामाजिक संघटनांच्या व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीमार्गाने आंदोलन उभारण्याची आवश्‍यकता आहे.

पुणे – बेंगलोर महामार्गानजिक बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उद्‌घाटन करून त्या ठिकाणी समाजकल्याण कार्यालय, जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालय आणि महामंडळांची कार्यालये स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने समाज कल्याण विभागाकडून गांभिर्याने प्रयत्न होत नाहीत. उलट आत्तापर्यंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आश्‍वासन देवून एक वर्ष उलटले तरी अद्याप उद्‌घाटन करण्यात येत नाही.

परिणामी न्याय भवनाच्या परिसराची झालेली दुरवस्था दै.प्रभातने यापूर्वी दोन भागांमध्ये समाजासमोर मांडली आहे. मात्र, आता उपेक्षित राहिलेल्या सामाजिक न्याय भवनाचे उद्‌घाटन करून खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारण्याची गरज आहे. कारण, प्रशासनाला जाब विचारला नाही तर येत्या काळात न्याय भवनाच्या भल्या मोठ्या इमारतींची आणखी दुरवस्था तर होणारच आहे त्याच बरोबर मागासवर्गीय समाजाला विविध कार्यालयांमध्ये जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट कायम राहणार आहे.

कार्यालयांसाठी होतोय लाखोंचा खर्च
समाज कल्याण कार्यालय, जातपडताळणी प्रमाणपत्र आणि महामंडळांची कार्यालये एका छत्राखाली यावीत, या उदात्त हेतूने सरकारने सामाजिक न्याय भवन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोट्यवधी रूपये खर्च करून इमारती ही उभारण्यात आली. मात्र, उद्‌घाटन होत नसल्यामुळे आज जात पडताळणी प्रमाणपत्रासह महामंडळांच्या कार्यालये भाड्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याला एकूण लाखो रूपये खर्च होत आहेत.

मुलभूत प्रश्‍नांची जाण येणार कधी
देशात एकाबाजूला महापुरूषांचे पुतळे व स्मारके उभारण्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू असताना दुसऱ्या बाजूला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येणारे सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे उद्‌घाटन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. न्याय भवनामुळे बहुतांश मागासवर्गीय समाजाची पायपीट थांबणार आहे त्याच बरोबर परिसरातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. मात्र, न्याय भवनाचे तात्काळ उद्‌घाटन व्हावे या दृष्टीने जनआंदोलन उभारण्यात येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)