संग्रहित छायाचित्र

अकरावीची हजेरी, शुल्क, क्षमेतपेक्षा जास्त प्रवेशाची तपासणी नाहीच

पुणे – अकरावी प्रवेशादरम्यान स्वीकारले जाणारे शुल्क, 75 टक्‍के हजेरी, बायोमॅट्रीक हजेरी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश आदी सर्व प्रश्‍नांना गेल्या काही महिन्यांपासून केराची टोपली दाखविण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. याबाबत तपासणी करण्याच्या, कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना असतानादेखील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून निष्क्रियता दाखविण्यात येत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांकडून उकळल्या जाणाऱ्या शुल्कापोटी सातत्याने आवाज उठवूनही कारवाई झालेली नाही. शासानाने ठरवून दिलेले शुल्क महाविद्यालये स्वीकारत नाही. तसेच याबाबत महाविद्यालयांवर कोणतीही कारवाई उपसंचालकांकडून केली जात नाही. तसेच अकरावी प्रवेशाचा केंद्रीय स्तरावर प्रवेश करण्याचा घाट दरवर्षी घातला जातो. मात्र, ग्रामीण भागात ऑफलाइन प्रवेश करून कोंचिंग क्‍लासेसशी साटेलोटे करणारी अनेक महाविद्यालये आहेत. अकरावीपेक्षाही बारावीत विद्यार्थी संख्या अधिक दिसते. याबाबत तपासणीचे आदेश देऊन दोन महिने होत आले तरीही, अद्याप प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. मागील वर्षीही प्रवेशाची तपासणी होणार, असे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, शेवटपर्यंत तपासणी झाल्याचा कोणताही अहवाल जाहीर केला गेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून बायोमॅट्रीक हजेरीचा निर्णय झाला असून त्या यंत्रणा बसविल्या आहेत की नाही, हेही तपासण्यात आलेले नाही. केवळ हेच नाही तर, प्रत्येक महाविद्यालयांमध्ये 75 टक्‍के हजेरी ही आवश्‍यक असतानाही त्याचीही अंमलबजावणी होते की नाही, हे तपासले गेलेले नाही. त्यामुळे या सर्व आदेशांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मागील वर्षीप्रमाणेच यंदाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)