आणखी एक “शोले’

     नीती अनीती

“शोले’ या एव्हरग्रीन चित्रपटातून प्रेरणा घेउन राळेगणचा वीरू पुन्हा एकवार रामलीला मैदानाच्या टाकीवर चढले व तमाम देशवासीयांना ‘गांववालो, ये जो मौसी हैना…! असे म्हणत पुनश्‍च यल्गार केला. अर्थातच मोठ्या मौसीची झोप उडाली व या वीर वीरूची समजूत काढण्याचे कंत्राट जळगावचे “जल संपला’ मंत्री ऊर्फ छोट्या मौसीला दिले. वीरू काही टाकीवरून खाली उतरायचे नाव घेत नव्हता.
‘गांववालो…. ये जो मौसी है ना, ये बहोत चलाख है.’ लोकपाल, लोकपाल’ ओरडत चार वर्षे उलटली, परंतु काही कारवाई नाही. लोकपाल, लोकपाल (‘सुसाईड’ ‘सुसाईड’च्या चालीवर)
मौसी गिरीश महाजन यांचेकडे सारे आशेने बघतात. मौसी ही सर्वांना शांत राहण्याचे सुचवते.
‘हे बघा वीरू आय मीन अण्णा… मला तुमची समजूत काढण्याची अवघड कामगिरी सोपवली आहे. तेव्हा आपण चर्चा करूया.’
‘लोकपाल लोकपाल! गांववालो यांना विचारा यांना का पाठवले? मोठी अहमदाबादची मौसी का नाही…?’ अण्णांच्या प्रश्‍नाने सारे अस्वस्थ होतात. त्यातला एक हिरीरीने पुढे येतो.
‘अण्णा, महाजन साहेबांना बिबट्या हुसकावून लावण्याचा अनुभव आहे. आठवतं? स्वतःची लोडेड रिव्हॉल्व्हर घेऊन बिबट्याच्या मागे पळाले होते. म्हणून कदाचित…’ तशी अख्ख्या रामलीला मैदानात खसखस पिकते.
‘मी काय बिबट्या आहे होय रे? माझी तुलना बिबट्याशी करता? कुठे फेडालं रे हे पाप?’
‘अण्णा, काय खोटं बोलले हो ते? मौसी रागाने ‘अहो आमच्या विरुद्ध रोष कुठे आहे लोकांत? म्हणून तर गांववालोची तुरळक गर्दी आहे यंदा. काय गरज होती हो उपद्‌व्याप करायची?’
‘ये देखो गांववालो, ये मौसी मनाने आयी है या डराने. अरे …. चाळीस पत्र पाठवलीत मोठ्या मौसी ला, पण एकाचे उत्तर नाही, काय हा अहंकार? लोकपाल लोकपाल …!’
‘कुठल्या जमान्यात राहाताय अण्णा? अहो, मोदी ऍपवर मॅसेज पाठवायचा, ताबडतोब उत्तर मिळते.’
‘आणि आमची माहिती लीक करायची, हो ना ?’
‘तुमची माहिती तुम्ही स्वतः लीकं केली आहे. दहा बाय दहाची एक खोली, एक गादी, एक ट्रंक आणि एक पीए… बरं चला खाली या, उपोषण पुरे आता, हे घ्या.’
‘हे काय आहे ?’
‘पकौडे, लिंबू पाण्याऐवजी पकौडे खाऊन उपोषण सोडायचे. पकौड्यामुळे रोजगार मिळतो व उपोषण ही सुटते असा प्रचार करूया व नवा ट्रेंड सेट करूया. येताय ना अण्णा ..?’
अण्णा विचारात पडतात, एकवार मौसीकडे व एकदा पकौड्याच्या प्लेटकडे बघतातं व टाकीच्या पायऱ्या उतरायला सुरुवात करतात.
मोजकेच गांववाले मौसी व वीरूच्या नावाचा जयघोष करतात व मिरवणुकीच्या तयारीला लागतात.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)