आणखी एक अपघात

संग्रहित छायाचित्र

केंद्रातील मोदी सरकारमध्ये रेल्वेखात्याचा कारभार सांभाळणाऱ्या सुरेश प्रभू यांची कारकीर्द प्रारंभीच्या काळात अनेक चांगल्या निर्णयांनी गाजली. रेल्वेची कामगिरी सुधारली अशी प्रतिक्रीया व्यक्त होत असतानाच रेल्वेच्या अपघातांचे सत्र सुरु झाले आणि या चांगल्या कामगिरीला काळा डाग लागण्यासही सुरुवात झाली. मंगळवारी दुरांतो एक्‍सप्रेसला झालेल्या अपघातामुळे हा डाग आता अधिकच मोठा होउ लागला आहे.जरी सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नसली तरी रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आणि प्रवाशांची गैरसोय झाली. दुरांतो ही महत्वाची रेल्वे आहे. तीच अपघातग्रस्त झाल्याने रेल्वेच्या सुरक्षेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

रेल्वे अपघातांचे हे सत्र सुरु असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारताने जपानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारत दौऱ्यावर आले असतानाच दुरांतो एक्‍सप्रेसचा अपघात झाला. रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक पाठवावे, अशी विनंती जुलै महिन्यात भारताने जपानला केली होती. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या भारत दौऱ्याआधी जपान सरकारने रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारतात पाठवले आहे. त्यांच्या दौऱ्याची सुरुवातच या अपघाताने झाल्याने त्यांना या विषयाचे गांभीर्य कळायला काहीच हरकत नाही.कारण गेल्या 15 दिवसातील हा तिसरा रेल्वे अपघात आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्‍स्प्रेस आणि कैफियत एक्‍स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. उत्कल एक्‍स्प्रेसच्या अपघातात 20 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर कैफियत एक्‍स्प्रेसच्या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात अपघाताची मालिका सुरु राहिली.हार्बर रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी लोकलचे 6 डबे रूळांवरून घसरले. या अपघातात एका महिलेसह तीन प्रवासी जखमी झाले आणि हार्बर मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली.

लोकलमधून गणपती घरी आणणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली होती. गेल्या तीन वर्षांमध्ये 28 मोठे रेल्वे अपघात झाले असून यात एकूण 259 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एकूण 973 प्रवासी जखमी झाले. लागोपाठ दोन रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभूंचा राजीनामा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय न घेता “वाट पाहण्याची’ सूचना केली होती. पण आता पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाल्याने प्रभूंच्या अडचणी वाढल्या आहेत आणि नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला हवा. मुख्य म्हणजे मोदी यांनी तो स्वीकारायला हवा. केवळ एका अपघातानंतर लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे उदाहरण आपल्या देशात नेहमीच दिले जाते. पण तसा प्रामाणिकपणा नंतर खूप कमी मंत्र्यांनी दाखवला हे वास्तव आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने मंत्र्यांची जबाबदारी ठरवणेही महत्वाचे आहे. मुजफ्फरनगरमधील अपघात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. या घटनेला जबाबदार धरून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यानंतर पुन्हा अपघात झाला. खरेतर प्रभू यांनी मागील रेल्वे अर्थसंकल्पात शून्य अपघात मोहीमेची घोषणा केली होती. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्रवाशांना अपघातमुक्त प्रवास करता यावा आणि मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ही योजना तयार केल्याचे ते म्हणाले होते. या मोहिमेसाठी राष्ट्रीय सुरक्षा कोष स्थापन करण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत पाच वर्षांत रेल्वेला अपघातमुक्त करण्याचे प्रयत्न करण्यात येणार होते. पण ही योजना कागदावरच राहिली असेच दिसते.

अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालय अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. योजनांवर काम सुरू आहे. पण त्या सर्व योजनाच अपयशी ठरल्याचे दिसून येते. सुरक्षित प्रवासासाठी एक्‍स्प्रेस गाड्यांचे डबे नवीन तंत्रज्ञानाने विकसित करण्यावर भर दिला जात आहे. पण त्यातील 90 टक्के डबे असुरक्षित असल्याचे खुद्द रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. एक्‍स्प्रेसचे डबे बदलायचे असल्यास किंवा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जुने डबे विकसित करायचे असल्यास त्यासाठी मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे. इतकी गुंतवणूक करणे सरकारला शक्‍य आहे का याचाही विचार करावा लागणार आहे. मुळात मध्यंतरीच्या काळात रेल्वे अपघातामागे दहशतवादी असल्याची शंका व्यक्‍त केली जात होती.काही अपघात हे घातपात असल्याचेही समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे यंत्रणेने अधिकच सतर्क होण्याची गरज होती. पण तसे झाले नाही.

दहशतवाद्यांचे काम अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणानेच करुन टाकले. गेल्या 3 वर्षाच्या काळात झालेल्या बहुतेक अपघाताना मानवी चुकाच जबाबदार असल्याचे सिध्द झाले आहे. पण या चुकापासून कोणताही बोध घेतला गेला नाही असाच अर्थ काढावा लागतो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर असो किंवा जपानी तंत्रज्ञानाची मदत असो,शेवटी मानवी कामगिरीच महत्वाची ठरणार आहे. कितीही आधुनिक तंत्रज्ञान दिले आणि ते तंत्रज्ञान वापरणारा निष्काळजी असेल तर अपघात टाळताच येणार नाही. म्हणूनच तांत्रिक सुधारणा करतानाच मानवी कौशल्याचा विकास करण्यासही प्राधान्य द्यायला हवे. देशात कोठे ना कोठे सतत होणारी अपघातांची मालिका रेल्वेला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मुळीच परवडणारी नाही हे कोठेतरी समजून घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)