आढेत तांबड्या मातीत रंगला कुस्त्यांचा फड

पाईट- खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील आढे गावात आदिमाया शक्‍ती आई वरसुबाई देवीच्या उत्सवाचे औचित्य साधून निकाली कुस्त्यांच्या आखाड्याने सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या तांबड्या मातीत मर्दानी खेळ असलेल्या कुस्त्यांचा फड रंगला आणि पंचक्रोशीतल्या तमाम कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यात्रा कमिटीचे आढे गावचे विनोद शिंदे म्हणाले की, आश्‍विन महिन्यातील तिसरा मंगळवारी गावचे ग्रामदैवत आदिमाया शक्ती आई वरसुबाई देवीचा उत्सव दरवर्षी संपन्न होत असतो. या पंचक्रोशीतील सर्वच लहान-थोरांची या आदिमाया शक्तीवर श्रद्धा असल्याने व या भागातील मोठा उत्सव असल्याने भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. या भागातील अबाल वृद्धांनी श्रीफळ वाढवून देवीचे दर्शन घेतले. सकाळी 8 ते 9 या वेळेत देवीच्या मूर्तीस अभिषेक करून हारतुरे घातले गेले. दुपारी देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. पालखीच्या मिरवणुकीस चिखली (ता. आंबेगाव) येथील शिवशक्‍ती ढोल झांज पथकाने ढोल पारंपारिक वाद्यातून कलेचे निरनिराळे प्रदर्शन करून समाजप्रबोधन केले. त्यानंतर निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा दुपारी अडीच वाजता सुरू करण्यात आला. यावेळी मोतीबाग तालीम कोल्हापूर, खेड, मावळ, आंबेगाव, पाथर्डी, पाटण तालुक्‍यातून मोठ्या संख्येने पहिलवान आले होते.
पहिलवानांनी तांबड्या मातीत कुस्तीतील अनेक डाव-प्रतीडावांचा खेळ करून कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पंच म्हणून विनोद शिंदे, सबाजी सावंत, रामदास सावंत, शंकर खंडाळकर यांनी काम पहिले. मनोरंजनासाठी महारष्ट्र राज्य पुरस्कार काळूबाई कला नाट्य मंडळ धामणे यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • राजकीय मल्लांचे डावपेच
    लाल मातीतील आखाड्यांच्या कुस्त्यांबरोबर राजकीय आखाड्यातील कुस्त्या चांगल्याच रंगल्या. निवडणुकीनंतर न पाहिलेले बऱ्याचशा राजकीय मल्लांचे डावपेचही कुस्ती शौकीनांना पहावयास मिळाले. काही दिवसांपूर्वी अमुक नेत्यांचे भक्‍त म्हणवून घेणारे कार्यकर्ते अचानक दुसऱ्या नेत्यांचे चेले झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रंगीत तालमींची काहीशी सुरुवात कुस्ती शौकिनांना पहावयास मिळाल्या.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)