आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सक्तमजुरी

पुणे – रेल्वे स्टेशन दाखविण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून सातारा रेल्वे स्टेशन गाठणाऱ्या सुरक्षा रक्षकाला एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला आहे.
पवनकुमार लिंगराज वझे (38, रा. गंगा परितोष सोसायटी, सनसिटी रोड मुळ रा. कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुजल रॉय (वय 8) याच्या अपहरण प्रकरणी त्याच्या वडीलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दि. 23 फेब्रुवारी 2014 रोजी आरोपी वझे हा फिर्यादींचा मुलगा सुजल याची सायकल दुरूस्त करून देतो म्हणून त्याला सोबत घेऊन गेला. नंतर त्याला रेल्वे स्टेशन दाखविण्याच्या बहण्याने त्याचे अपहरण केले. दरम्यान, त्याच्या वडिलांनी अपहरण झाल्याची फिर्याद दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता वझेच्या मोबाईलच्या लोकेशनवरून तो साताऱ्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सातारा येथील रेल्वे स्टेशन येथून दि. 24 फेब्रुवारी 2014 रोजी पहाटे त्याच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. तपास करून न्यायालयात त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी काम पाहिले. त्यांनी अकरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये सुजलची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. सरकारी पक्षाच्या पुराव्यांनुसार आणि युक्तीवादानंतर न्यायालयाने वझे याला 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)