आठ देशांना दिलेल्या तेल आयात सवलतीचे ट्रम्प यांच्याकडून समर्थन 

विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचा मात्र आक्षेप 

वॉशिंग्टन: तेलाच्या किंमतींवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आठ देशांना इराणहून तेल आयात करण्याची तात्पुरती सवलत आम्ही दिली आहे असे समर्थन अध्यक्ष ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे त्या देशाशी कोणतेही आर्थिक व्यवहार करणाऱ्या देशांवरही अमेरिकेची वक्र दृष्टी राहणार आहे. तथापी ट्रम्प यांनी आठ देशांना ही जी सवलत दिली आहे त्यावर विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार टीका केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेचे हे निर्बंध सोमवार पासून लागू झाले आहेत. त्यामुळे इराणहून तेल आयात चालूच ठेवण्याचा निर्धार काही देशांनी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या बाबतीत अमेरिका काय निर्णय घेणार या विषयी औत्स्युक्‍य होते. अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारताखेरीज चीन, इटली, ग्रीस, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि तुर्की या देशांना अमेरिकेने इराणहून तात्पुरत्या स्वरूपात तेल आयात चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की इराणवरील आमचे आर्थिक निर्बंध अत्यंत कडक आहेत. पण तेलाच्या बाबतीत मात्र आम्ही जरा सबुरीने घ्यायचे ठरवले आहे कारण ते निर्बंध कडक स्वरूपात लागू केले तर त्याचा इंधनाच्या किंमतीवर जागतिक पातळीवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

आठ देशांना आम्ही तेल आयातीबाबत सूट दिल्याने तेलाच्या किंमती भडकणार नाहीत असा दावा त्यांनी केला. दरम्यान आठ देशांना ही सवलत दिल्याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या सवलतीमुळे अनेक देशांत निर्यात सुरूच ठेऊन इराण अब्जावधी डॉलर्सची कमाई करू शकतो. अध्यक्ष ट्रम्प यांनीच त्यांच्यासाठी हा मार्ग मोकळा ठेवला आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या निर्बंधांची फिकीर करण्याची गरज नाही असाही संदेश जगातील अन्य देशांमध्ये यातून जाणार असल्याने अमेरिकेच्या निर्बंधांना यापुढे कोणीही जुमानणार नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)