आठवण: दुसरी बाजू चंद्राची

नीलिमा पवार

चीनचे अंतराळयान चांग ई-4 चंद्रावर उतरल्याचे बातमी काल वाचली. खरं तर चंद्रावर अंतराळयान गेल्याची काही नवलाई नाही राहिलेली. चंद्रावर आतापर्यंत अनेक अंतराळयाने उतरली आहेत. त्यांनी चंद्रावरची माहिती पाठवली आहे. तेथील खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले आहेत. त्यांचा अभ्यासही झाला आहे. चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला मानव म्हणून अमेरिकेचा अंतरालवीर नील आर्मस्ट्रॉंगचे नाव अजरामर झाले आहे, तसे चंद्रावर पाऊल टाकणाऱ्या दुसऱ्या मानवाचे, त्याच्या साथीदाराचे एडविन ऑल्ड्रिनचेही झाले आहे. अमेरिकेने अपोलो मालिकेत अनेक अंतराळयाने अवकाशात पाठवली. चंद्रावर माणसे पाठवली. आता तर चंद्रावर पर्यटनासाठी जाण्याच्या गोष्टी होत आहेत. काही अब्जाधीशांनी चंद्रावर जाण्यासाठी बुकिंग केल्याचेही बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्र हा तसा माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. आजच नाही, तर अगदी अनादीकालापासून. चंद्र पृथ्वीवासीयांना इतका जवळचा की त्याला आपण आपल्या धरणीमातेचा-पृथ्वीचा भाऊ करून टाकला आहे. आणि चांदोमामा करून टाकला आहे. चांदोमामाची गाणी अगदी लहानपणापासून आपल्या कानी पडतात, आपल्याला शिकवली जातात. चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी… हे गाणे तर आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी ऐकले आहे, म्हटले आहे आणि आपल्या मुलाबाळांना, भाच्यापुतण्यांना शिकवलेही आहे. रामाने लहान असताना खेळायला चंद्र पहिजे म्हणून हट्ट केल्याची आणि मंत्री सुमंत यांनी त्याचा हट्ट पुरवल्याची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. आणि चंद्रावरचा ससा तर आपला आवडता आहे. चंद्र रथातून फिरायला जाताना चंद्र सशाला मांडीवर घेऊन बसतो. त्याचा आकार आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. लहानपंणी दिसायचा आणि आताही दिसेल. फक्त आता तो ससा आहे यावर आपण विश्‍वास ठेवणार नाही. आपण त्याला चंद्रावरचे डाग म्हणू. चंद्रावरचा ससा आपल्याला कायमच दिसतो. कारण चंद्राची एकच बाजू आपल्याल नेहमी दिसते. त्याला शास्त्रीय कारण आहे.

चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो आणि त्याच वेळी स्वत:भोवतीही फिरतो. या दोन्ही गती समान असल्याने चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीवरून दिसत्ते. चीनचे अंतराळयान चंद्रावर उतरले, याचे कौतुक याच गोष्टीत आहे, की ते चंद्राच्या आपल्याला न दिसणाऱ्या बाजूवर उतरले आहे. आणि त्यामुळेच चंद्राबद्दल आजवर माहीत नसलेली माहिती आता आपल्याला मिळणार आहे. आतापर्यंत चंद्रावर गेलेली सर्व अंतराळ याने त्याच्या आपल्यासमोरील भागात उतरली. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आणि त्यांनी पाठवलेली माहिती आपल्यापर्यंत सहजपणे पोहचत होती. तसे पलीकडच्या भागावरून होऊ शकत नाही. त्यासाठी चीनने अगोदरच तयारी करून ठेवली आहे. चंद्राच्या दुसऱ्या बाजूवरील संदेश सरऴ पृथ्वीपर्यंत येऊ शकत नाहीत, त्यासाठी चीनने क्‍युकियाओ नावाचा एक रिले उपग्रह सोडलेला आहे. चंद्राच्या दुसऱ्या बाजूकडून येणारे संदेश क्‍याकियाओ स्वीकारून नंतर ते पृथ्वीवर पाठवणार आहे. म्हणजे क्‍युकियाओ मध्यस्थाचे काम करणार आहे. आता मला कौतुक असे वाटते, की चंद्राच्या दुसऱ्या बाजूची माहिती मिळवण्यासाठी माणूस इतका खटाटोप करतो. खर्च करतो, धोके पत्करतो, या साऱ्याचा फायदा होईलच याची काही खात्री नसते, पण मानव त्यासाठी प्रयत्न करत असतो हे तर अगदी सत्य आहे.

आता प्रश्‍न असा पडतो, की पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राच्या दुसऱ्या बाजूची माहिती घेण्यासाठी माणूस इतका खटाटोप करतो. पण आपल्या अगदी परिचयातील, जवळच्या अगदी रक्ताच्या नात्याचा माणसाचीही दुसरी बाजू समजून घेण्याचा आपण सहसा प्रयत्न करत नाही. जे दिसते त्यावरच विश्‍वास ठेवतो आणि त्या माणसाबद्दल गैरसमज करून घेतो. ते वाढवतो, दूर करण्याचा तिळमात्र प्रयत्न करत नाही. जगातील 90 टक्के भांडणे-वाद-युद्धे-लढाया या अशा अर्धवट माहितीमुळे, दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न न केल्याने होत असतात.

पृथ्वीपासून सुमारे 4 लाख किमी अंतरावर असलेल्या चंद्राची दुसरी बाजू जाणून घेण्याची आपल्या उत्सुकता आहे, तशी आपल्यापासून चार हात दूर राहणाऱ्या आपल्याच घरातील माणसाबद्दल का नसावी,?
माणूस लाखो, करोडो किमी अंतरावर असलेल्या गोष्टीं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या घरातील, गावातील, देशातील, आपल्या पृथ्वीवरील माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तो केला तर सारे जगच सुखी होईल यात काही शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)