आठवण कॉफीची…

सुनंदा जोशी 

मनुष्य जीवनाला “जीवन’ म्हणजे पाणी असे म्हणतात. जीवन हे पाण्याप्रमाणे सतत वाहात असतं. पाणी वाहताना त्या त्या स्थळाचे, मातीचे गुण, रंग, रसायनं, क्षार, चवी सारंच आपल्याबरोबर घेऊन पुढे जात असते. नाना ठिकाणचं सकस, निकस घेऊन जगणाऱ्या हजरजबाबी, करामती व्यक्तीला म्हणूनच “बारा गावचं पाणी प्यालेला’ म्हणतात. असं या जीवनाचं स्वरूप प्रत्येक व्यक्तीचं जीवन म्हणजे आठवणींचं मोहोळ असतं. या आठवणी व्यक्तींच्या असतात, स्थळांच्या असतात, प्रसंगांच्या असतात. काही गोड, काही कडू, काही तिखट, काही चविष्ट, काही सपक पण आठवणी या आठवणी असतात. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा मनावर हृदयावर आणि विज्ञानाच्या भाषेत मेंदूवर एक ठसा बसलेला असतो. आणि वर्तमानकाळात पुन्हा केव्हा तरी तशी घटना वा प्रसंग घडला की जुनी आठवण उफाळून वर येते. एखादं थुई थुई नाचणारं कारंज जसं दर्शनीय असतं, मनाला आल्हाद देतं तसं या आठवणींचं असतं. या आठवणी सुखद असो वा दुःखद पण त्या जेव्हा येतात तेव्हा बोचतात हे नक्की. 

अशीच एक आठवण! कॉफीची आठवण. एक कप कॉफीची किंमत 350 रुपये आणि दोन कप कॉफीची किंमत 700 रुपये! हो आम्ही दिले. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा कधी मधी कॉफी पितो तेव्हा पहिल्या घोटाला समोर येते ती कॉफीसाठी दिलेली किंमत. तसे आम्ही अगदी महाराष्ट्रीयन म्हणजे चहाबाज. चहावर प्रेम करणारे. रोज चहाच पितो; पण कधीतरी- बदल म्हणून (वैद्यकीय सल्ल्यानुसार) किंवा बाहेर प्रसंगानुसार कॉफीचा कप समोर आला की…
त्याचं असं झालं. आम्ही 2013 साली इजिप्त, ग्रीस, टर्की अशी सहल केली. या सहलीत आमचं मुख्य आकर्षण होतं इजिप्तमधील पिरॅमिड्‌स. परदेशी सहल म्हणजे ओघानं परदेशी चलन जवळ बाळगणं आलं. कारण आमचा हसऱ्या मुखवट्याचा गांधीबाबा आम्हाला कितीही प्रिय असला तरी परदेशात गेल्यावर त्याचं वजन चलनात चालतच नाही. पौंड, युरो, डॉलर्स, सिंगापूर डॉलर्स रिंगीट आणि यूआन, येन या सर्व चलनांपुढे “रुपया’ कुठेच नसतो.

म्हणजे चलनांचे रूपांतर कोष्टक दाखवतात, त्यात तो दिसत नाही. असो तर आम्ही आपल्या रुपयांचे मूल्य देऊन युरो बरोबर ठेवले होते. या सहलीत कैरो, अलेक्‍झॉंड्रिया नाईल नदीची क्रुझमधून सफर अशा अनुभवाचं गाठोडं बांधत बांधत ग्रीसची राजधानी अथेन्स येथे आलो. अर्थात अथेन्समध्ये काय पाहिलं हे आता सांगण्यात वेळ घालवत नाही, पण तो दिवस होता 1 मे. जागतिक कामगार दिन. त्यामुळे 1 मे शी संबंधित तिथलीही एक आठवण टिटॅनिया हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता 1 मे ला सकाळी आवरून बाहेर पडलो तर हॉटेलचे कर्मचारी प्रमुख दरवाजावर संरक्षक दरवाजे बसवत होते. तेही अत्याधुनिक तंत्राने चौकशी केली तेव्हा समजलं की, रस्त्यावरून कामगारांचा मोर्चा जातो न जाणे मिरवणुकीचे रूपांतर मोर्चात झाले आणि काही दगडफेक वगैरे झाली तर नुकसान होऊ नये म्हणूनही व्यवस्था! एकूण काय तर इंडिया असो वा अथेन्स (ढहश र्लीेपीीूं ेष र्लीश्रश शूशी) मानवी प्रवृत्ती सारखीच! जेव्हा जेव्हा 1 मे येतो तेव्हा तेव्हा अथेन्समध्ये घडलेली ही घटना ताजी होते. आठवणी अशा तारखांशीही जोडलेल्या असतात.

तर अथेन्स शहर दाखवताना, ग्रीस पाहताना अर्जिना, पौरस व हैड्रा या बेटांना क्रुझमधून भेटी दिल्या. आमच्या गाईडने खरंतर सूचनांचा पाढा वाचलेला असूनही घडू नये ते घडले.
क्रुझवर गेल्या गेल्या स्वागताला तिथले नम्र, हसतमुख कर्मचारी हजर व्हॉट वील यू प्रीफर मॅम? असा लाडिक प्रश्‍न त्याला उत्तरादाखल एक टॅग कॉफीचिनो? आम्ही फक्त कॉफी शब्द ऐकला (चिनोचा संबंध चिनी म्हणजे साखरेची असावी) आणि दोन कपाची ऑर्डर दिली. गरम वाफाळलेले कॉफीचे कप क्रुझची मंद हालचाल भोवताली निळाशार समुद्र (सरोनिक गल्प) आस्वाद घेत कॉफी संपली अन्‌ ट्रेमध्ये बिल. 10 युरो! क्रुझमध्ये फक्त दुपारचं आणि रात्रीचं जेवण फ्री ही गाईडची सूचना विस्मरणात गेलेली! गत्यंतर नव्हते. 10 युरो म्हणजे 700 रुपये बिल दिलं आणि पुढील प्रवास संपेपर्यंत गाईडच्या सूचना कंठस्थ करण्याचं व्रत घेतलं. असो, आजही कफी पिताना ही आठवण येते. अर्थात कॉफी कुठं प्यालो हीही आठवण त्या मागे रेंगाळतेच, पण सलणारं जास्त आठवतं हेच खरे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)