आठवण : आठवणीतील सुशि

प्रसन्न पाध्ये

सुशि अर्थात सुहास शिरवळकर. मराठी कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक अशी त्यांची ओळख. 15 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. 15 वर्षे झाली त्यांना आपल्यातून जाऊन, पण त्यांच्या लेखनाचे गारूड अजूनही कायम आहे. सुशिंचे जाणे अजूनही अनेकांना खरे वाटत नाही. त्यांना भेटण्यासाठी, त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी, एखाद्या कथेचे रूपांतर करण्यासाठी परवानगी हवी म्हणून येणारेही अनेकजण आहेत. पन्नाशी-साठी ओलांडलेल्या चाहत्या वर्गाप्रमाणेच आजची तरुणाईही त्यांच्या लिखाणावर भरभरून प्रेम करते. या आठवणींना सुहास शिरवळकर यांच्या पत्नी श्रीमती सुगंधा शिरवळकर यांनी दिलेला उजाळा…

सुशि यांचा 1973 साली सुरू झालेला लेखन प्रवास त्यांच्या जाण्यापर्यंत म्हणजे 2003 पर्यंत अव्याहतपणे सुरू होता. लघुकथा, रहस्यकथा आदी विविध अंगांनी त्यांचे लेखन झाले. आमचे लग्न झाले तेव्हा ते शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होते. लिखाणाच्या उर्मीतूनच त्यांनी शाळेतील नोकरी सोडून लेखनाचा मार्ग स्वीकारला. नोकरी सोडून लेखनाकडे वळावे, असा तो काळ नव्हता, पण त्यांचे नोकरीत मनच रमत नव्हते. लग्नानंतर एका वर्षाने व्यवसाय म्हणून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला.

300 पेक्षा जास्त पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले. अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहतावर्ग निर्माण झाला. मित्रपरिवारही खूप मोठा-वेगवेगळ्या क्षेत्रातील. डॉक्‍टर, वकील, चित्रकार, एवढेच काय, एसटी ड्रायव्हर, कंडक्‍टरसुद्धा! चिपळूण प्रवासातील एक प्रसंग कायम आठवणीत राहणारा आहे. एसटीने चिपळूणला जात असताना ते कंडक्‍टरच्या शेजारीच बसले होते. ते कंडक्‍टर महाशय सुशिंचेच एक पुस्तक अगदी तल्लीन होऊन वाचत होते.

पुस्तकाच्या शेवटच्या पानावरील फोटो आणि शेजारी बसलेली व्यक्ती ही एकच आहे हे जेंव्हा त्या कंडक्‍टरना समजले, तेव्हा ते वेडेच झाले. सुशिंना ते त्याच एसटीमधूनच प्रवाशांसह स्वत:च्या घरी घेऊन गेले. एसटी स्टॅंडकडे जात नसल्याचे पाहून प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, पण हट्टाला पेटून त्या कंडक्‍टरने सुशिंना आपल्या घरी नेऊन चहा पाजला आणि त्यानंतर एस्टी स्टॅंडवर नेली. ही घटना 1988 सालातील. मुंबईतले डॉ. सुरेशचंद्र फडके.

अष्टविनायक दर्शनानिमित्त त्यांचा रात्रीचा मुक्काम पुण्यात होता. शिरवळकरांना भेटण्याची त्यांना तीव्र इच्छा होती. लेखन संपवून रात्री अडीच-तीन वाजता शिरवळकर झोपले होते. तेवढ्यात डॉक्‍टरांनी शिरवळकरांना हाक दिली. एवढ्या रात्री कोण आले आहे असा प्रश्‍न त्यांनी केला. चौथ्या मजल्यावरून खाली जाऊन पाहिले तर फडके दाम्पत्य होते. डॉक्‍टर आणि त्यांच्या पत्नीला मी वर घेऊन आले. जवळजवळ अर्धा तास ते त्यांच्याशी बोलत होते. नंतर त्यांच्यात नियमित पत्रव्यवहार होऊ लागला. ही त्यांची मैत्री अखेरपर्यंत कायम राहिली.

टू व्हिलरवरून फिरणे हा जसा त्यांचा छंद होता, तसाच वाचकांना नियमित भेटणे आणि वाचकांच्या पत्रांना आत्मियतेने उत्तर देणे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. लिखाणाचा जेव्हा मूड असेल तेव्हा ते आलेली पत्रं नीट गोळा करून ठेवत आणि लिखाण पूर्ण झाल्यानंतर ते प्रत्येक वाचकाच्या पत्राला उशिरा का होईना उत्तर देत. त्यात जशी कौतुकाची पत्रे असायची, तशीच भयंकर, भडक भाषेतही पत्रे असायची. वाचकांच्या हृदयापर्यंत भिडलेल्या सुशिंवर लेखक म्हणून वाचकांनी भरभरून प्रेम केले, पण काहींना लेखकातील माणूस बाहेर काढता आला नाही. साहित्यकृतीत उमटलेली व्यक्तिरेखा आपलीच आहे, असे अनेक वाचकांना आजही वाटते.

साधी-सोपी, सामान्य माणूस समजू शकेल अशी त्यांची लेखनाची शैली, त्यामुळे वाचकाला सुशिंचे लिखाण भावले. वेगवेगळ्या कारणांनी सुशिंबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात फिरणे झाले. त्यावेळी अगदी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या अवतीभोवती वाचक-चाहत्यांचा गराडा हा असायचाच. घरी असतानासुद्धा लेखन आणि चाहत्यांचा गराडा यामुळे बाबा आम्हाला मिळत नाही, कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये अडकलेले असतात’, अशी मुलांची तक्रार असायची. घरात वावरताना ते मुलांबरोबर वडील म्हणूनच वावरले. कुठल्याही गोष्टी त्यांनी मुलांवर लादल्या नाही. मुलांनी सांगितलेल्या गोष्टीही त्यांनी मन लावून ऐकून घेतल्या. वेळ आहे ना, येणार ना असे विचारून मुलाने “शहेनशहा’ चित्रपटाचे रात्रीच्या शोचे तिकीट काढून आणले होते. आमचे सर्वांचे एकत्र चित्रपट पाहायला जाण्याचे ठरले होते. निघायच्या वेळीच सुशिंना भेटायला त्यांचे एक चाहते आले आणि ते गप्पात रंगून गेले.

आम्ही चित्रपट पाहून परत आलो तरी त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. लेखक म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने वाचकांशी नाळ जोडली गेली आहे. त्यांच्या जाण्यानंतर ही नाळ तुटली असे अद्यापपर्यंत झालेले नाही. त्यांच्या लेखनाच्या नवनव्या आवृत्त्या तरुणांच्या हाती आजही पडत आहेत. तरुणवर्ग मोठ्या आवडीने त्यांच्या कथा वाचत आहे. आजही बरेच जण त्यांची पुस्तके घेऊन येतात आणि सुहास शिरवळकर यांची स्वाक्षरी हवी आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतात. ते आता नाही असे सांगितल्यानंतर आम्हाला अजूनही खरे वाटत नाही असे वाचक सांगतात.

एवढेच नाही तर कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यासाठी अजूनही लोक येतात. सुशिंचा चाहता वर्ग खूप मोठा. त्यामुळे त्यांना येणारी पत्रेही खूप मोठ्या संख्येने असायची. सुशिंच्या जाण्यानंतर त्यांना आलेल्या पत्रांचे संकलन करुन निवडक एक हजार पत्रांचे पुस्तक तयार करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन कुणा मोठ्या व्यक्तीच्या हस्ते न करता वाचकांच्या हस्तेच करायचे असे ठरविले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा फेब्रुवारीत झाला.

या पुस्तकाचे प्रकाशन ज्या वाचकांच्या हस्ते झाले त्यांनाही त्याचे खूप कौतुक वाटले. ग्रंथालयांमध्ये सुशिंच्या पुस्तकांना अजूनही मागणी आहे. आपलीच कथा पुस्तकरुपाने येत आहे, असे तरुणांना अजूनही वाटते. आवडलेले पुस्तक परत परत वाचण्यासाठी हवे असूनही मिळत नाही, तेंव्हा पुस्तक अक्षरश: चोरतो असे सांगणारेही वाचक आहेत. एकंदरीत काय सुशि अजूनही आठवणरुपाने अनेकांच्या मनात घर करुन आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)