#आठवण: अटलजींचे जीवनसूत्र (भाग-१)

लालजी टंडन 
ज्येष्ठ भाजपा नेते 
अटलजी असो वा मी, आम्ही सर्वसामान्य माणसाचे आयुष्यही जगलो आहोत. आपण सर्वच कधी ना कधी या परिस्थितीमधून जात असतो, गेलेलो असतो. कधी कधी आम्हाला दिवस-दिवस अन्न मिळत नसे. पण तरीही राजकारणात दिसणारी द्वेषाची आणि कटुतेची भावना मनामध्ये रुजली नाही. कुणाकडेच काहीही नव्हते.. ना माझ्याकडे, ना त्यांच्याकडे! अटलजींना संघर्षाविनाच सर्व काही मिळाले, अशी टीका काही जण करतात; पण अटलजी गावोगाव पायी फिरले आहेत, हे त्यांना माहीत नाही. आजही जेव्हा मी काही दूरवरच्या गावांमध्ये जातो, तेव्हा तेथील कुणी ना कुणी वयोवृद्ध अटलजींची आठवण हमखास काढतोच. आज त्या प्रत्येकाला अटलजींच्या जाण्याने वेदना झाली असेल. 
“छोटे मन से कोई बडा नहीं होता,
टूटे तन से कोई खडा नहीं होता..!’
अटलबिहारी वाजपेयी यांच्या या काव्यपंक्‍ती.
राजकारण असो वा सार्वजनिक जीवन, संकुचित विचार असणारे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत हेच अटलबिहारी यांच्या जीवनाचे विचारसूत्र आहे. सर्वांना साथीला घेत पुढे जाणे ही क्षमता अटलजींमध्ये प्रथमपासूनच होती. अटलजींच्या व्यक्‍तिमत्त्वाचे हे वैशिष्ट्य सुरुवातीपासूनच होते. मुळात अटलजींकडे स्वत:चे असे काही विचार आणि कर्तृत्व होते. तुमच्या स्वत:मध्येच काही नसेल, तर बाकीचे काहीही करू शकत नाहीत. पण तुमच्या स्वत:मध्ये ताकद आणि आत्मविश्‍वास, कर्तृत्व असेल, तर सहवासात आलेल्या इतरांचे योगदानही आपल्या विकासासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, नारायण देशमुख, भाऊराव देवरस यांनी अटलजींना घडविले, असे म्हणता येऊ शकेल. दीनदयाळजींचे वैचारिक संस्कार, माणूस घडविण्याची भाऊराव देवरसांची क्षमता आणि नानाजी देशमुखांचे बहुआयामी व्यक्तिमत्व यांना डॉ. मुखर्जी यांच्यासारख्या नेतृत्वाची जोड लाभली आणि त्यातून अटलजींचे व्यक्‍तिमत्त्व घडले.
बेरजेचे राजकारण करण्याची सुरुवात देशामध्ये सर्वांत आधी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती. डॉ. मुखर्जी जेव्हा विरोधी पक्षनेते झाले, तेव्हा त्यांच्या पक्षाचे सदस्य कमी होते. त्यावेळी विरोधामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांची एकजूट करून डॉ. मुखर्जी यांनी पंडित नेहरू यांना वैचारिक पातळीवरही आणि त्यांच्या धोरणांच्या पातळीवरही कडवे आव्हान उभे केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनीही कालांतराने बेरजेचे राजकारण यशस्वी करून दाखवले.
मंदिरामध्ये स्तंभ असतात. त्याच्यावर छत येते. मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्यावर कळस बांधला जातो. आता या सर्वांमध्ये सर्वाधिक महत्त्व कशाचे? ज्या जमिनीवर हा दगड आहे, त्याचे? ज्या स्तंभांवर मंदिर पेलले आहे, त्याचे? सर्वांना छायेत घेणाऱ्या त्या छताचे की बाह्य रूपाने मंदिराचे सौंदर्य वाढविणाऱ्या त्या कळसाचे? अटलजी ज्या वैचारिक संघटनेच्या मुशीत तयार झाले, तशीच वैचारिक बैठक भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांनाही आहे. अटलजींबरोबर असणारे नेते कुठल्याही बाबतीत कमी नव्हते. या देशात एक राष्ट्रवादाची इमारत उभी राहिली आणि त्याचा कळस अटलजी झाले.
आता ही इमारत उभी करण्यात सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिभा, गोळवलकर गुरुजी, देवरस आणि दीनदयाळ उपाध्याय यांची विचारसरणी या सर्वांचा मिळून एक समूह झाला. हा समूह होता वैचारिक बैठक, नैतिक साहस, संघटनाचे कौशल्य आणि नि:स्वार्थीपणे देशासाठी जीवन समर्पण करणाऱ्या वृत्तीच्या लोकांचा! या सर्वांनी आपापल्या जागी काही कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. डॉ. मुखर्जी यांच्या निधनानंतर देशाचा आवाज बनण्याची गरज या सर्वांनी मिळून भागवली. डॉ. मुखर्जींनंतर नेतृत्वाचा अभाव असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळी अटलजींना नेता म्हणून मान्यता मिळू लागली होती. एक कवी, एक पत्रकार, एक विचारवंत, वाणीवरील प्रभुत्व यामुळे अटलजींच्या नेतृत्वगुणांचे प्रोजेक़्शन झाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)