आठवणीतली दिवाळी

दिवाळी संपताना थोडसं उदास वाटायला लागतं. टांगलेला आकाशकंदील काढताना, विझलेल्या पणत्या आवरताना.. किल्ल्यावरील मावळे खोक्‍यात ठेवताना… किल्ला पाडून ती जागा साफ करताना… फराळाच्या डब्याच्या तळाशी असलेलं चिवड्याचं थोडसं खारट भुस्कट तोंडात टाकताना… व्हॉटस्‌ अॅपमधील शुभेच्छा डिलीट करताना… दिवाळी अंक चाळताना… बॅगा भरून माणसे परतीच्या प्रवासाला चाललेली पाहताना…नातवंडे आपापल्या घरी निघालेली पाहून आज्या डोळे पुसताना… अमेरिकेतून आलेली सून मुलगा आणि नातवंडे परत निघाल्याने निःशब्द होताना दिवाळी म्हणजे नक्की काय.. हे समजतं!

यंदा देशातील सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीवर बंधने आणल्यामुळे काही लोकांच्या आनंदावर विरजण पडण्याची व फटाके विक्रेत्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. रात्रीच्या वेळेतच फटाके फोडण्याचा निर्णय लोकांना त्रासदायक वाटणार. कारण नरक चतुर्दशीला व अमावस्येला (मुख्य दिवस) पहाटे उठून फटाके फोडण्याची पद्धत आहे. ग्रीन फटाके कमी आवाजाचे व प्रदूषणही कमी करणारे आहेत म्हणून त्याचा वापर करण्याचेही न्यायालयाने सुचविले आहे, पण आता हा निर्णय खूप अगोदर यायला हवा होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निमित्ताने लहानपणचा फटाक्‍यातील आनंद आठवला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्याच शब्दात उतरल्या. एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरू झालेली असायची. खाजगी शिकवणी, कोचिंग क्‍लास असली भानगड तेव्हा नव्हती. त्यामुळे दिवाळीनिमित्त शाळेला पूर्ण तीन आठवडे खरी सुट्टी असायची. दसऱ्यापासूनच थंडी पडायला लागायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची. दिवसभर मातीत खेळून हाथ-पाय थंडीने तडतडायचे. महागडं कोल्डक्रीम माहितीच नसल्याने आमसूल तेल मिळायचं. लावलं की त्वचा एकदम मऊ होऊन जायची. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. दिवस जायचा गड राखण्यात. ना कुठली सिरियल बघायची असायची ना क्रिकेटची मॅच. कारण टीव्हीच नव्हता. सुट्टीत अभ्यास करताना कुणीही दिसत नसे. थोडी मोठी आणि वाचनाची आवड असलेली मुलं दिवाळी अंक वाचण्यात दंग व्हायची.

फटाक्‍यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग पिग्मी बॅंक फोडली जायची. त्यात जमवलेली, खाऊसाठी म्हणून दिलेली पाच, दहा, पंचवीस पैशांची नाणी बाबांना द्यायची. फटाके आणायला तेवढाच खारीचा वाटा. फटाक्‍याच्या दुकानात अधाश्‍यासारखं व्हायचं. लवंगी, लक्ष्मी, सुतळी बॉम्ब, कनकावळे, भुईनुळे, भुईचक्र, फुलझडी, नागगोळी, टिकल्या आणि पिस्तूल. पिशवी गच्च भरायची.टोकदार वस्तू आडकून फाटणारी कॅरीबॅग तेव्हा अस्तित्वात नव्हती. फटाके घेतले की एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं. घरी येऊन छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. त्या काळी “हम दो हमारे दो, किंवा एकच” ही भानगड नव्हती. प्रत्येकाला बहीण आणि भाऊ हमखास असायचेच. मोजणी करताना अगदी वात गळालेल्या फटाक्‍यांची सुद्धा व्हायची. हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. एक वेगळा पण हवाहवासा वास यायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारूबद्दल माहिती तेव्हाची. मला आठवतंय, बाबा शिक्षक होते. दिवाळीपूर्वी कुणीतरी वरचा अधिकारी इन्स्पेक्‍शनला आला होता. यंदा दिवाळीत फटाके फोडणार नाही अशी सगळया विद्यार्थ्यांना शपथ दिली होती. फटाके आणायला बाबांनी स्पष्ट नकार दिला होता. मी रुसून बसलो होतो. फराळाचंच काय जेवणही बंद केलं होतं. बाबांचा तर नाईलाज होता.

आईच्या घशाखाली घास उतरत नव्हता. मी हार मानायला तयार नव्हतो. दिवाळीचा पहिला दिवस असाच कोरडा गेला. आईने काय केले माहीत नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मामा पिशवी भरून फटाके घेऊन आला. मी त्या दिवशी पहिल्यांदा बाबांच्या डोळ्यात पाणी येताना पाहिलं. पोरांनो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचंय आजी सांगायची.

मोबाइल माहितीच नव्हते.आताच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर लावला जायचा. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, पहाटे पहाटे दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. मग आई उठवायची.परसदारात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात उब यायची. आई उटणं लावायची. खरं चंदनाचं उटणं असायचं. गार लागायचं. तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान वाटायचं.प्लॅस्टिकचे मग नव्हते. शॉवर माहितीच नव्हता. त्या पाण्याला धुराचा वास असायचा. मला तो फार आवडायचा. मोती साबण छोट्याश्‍या हातात मावायचा नाही. मोती साबण मात्र तेव्हापासून आज आहे तस्साच आहे. बादलीतलं पाणी संपूच नये असं वाटायचं. आता गिझर, सोलर हिटर असल्यानं पाणी कितीही घ्या, संपायचं टेन्शनच नाही आणि भरपूर आहे म्हटलं की संपण्यातली मजाच गेली. मग औक्षण केलं जायचं.

आता मनात विचार येतो, पत्नी अजूनही आपल्याला अंगाला तेल आणि उटणं लावते. औक्षण करते. आजी, आई आणि पत्नी यांना कधी कुणी तेल लावताना, औक्षण करताना पाहिलं नाही. त्यांनाही मनातून आपलंही असंच कुणी तरी कौतुक करावं असं नसेल वाटत? देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्‍याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं. मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा, बाकी सगळे सोडून, एक एक करून वाजवायचे. ताई घाबरायची म्हणून मग तिला वात काढून द्यायचो. छोटा फटाका हातात धरून उदबत्तीला लावून फेकायचो आणि धीटपणाची फुशारकी मारायची. चुकून कधीतरी फटाका हातात फुटायचा. फटाके वाजवायचे, पण पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा आनंद व्हायचा त्याचा! आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं? लहान होऊन, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे?

सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये का? आपण खूप पुढे आलोय का? दिवाळीचा सण म्हणजे “तमसो मा ज्योतिर्गमय”. मग त्याला तेलाच्या मंद पणतीचाच प्रकाश हवा असे थोडेच आहे. ट्युब आणि बल्बचा झगमगाट ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारच की? दिवाळी हा प्रकाशाचा, मांगल्याचा, जीवनातील अंधःकार नष्ट करणारा पुरातन काळापासून चालत आलेला सर्वसमावेशक असा आपल्याला पुर्वजांनी दिलेला वारसा. कितीही बदल झाले तरी मानवाच्या अंतापर्यंत चालू राहणारच. नव्यांनी आणि जुन्यांनी तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायला हवा हाच तर या दीपोत्सवाचा प्रकाशमय संदेश.

बदल हा निसर्ग नियम असून तो जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रदूषण रोखण्यासाठी मिळणारा प्रतिसाद, बदलणारे जनमानस, गरिबांनाही दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून अनेक वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवर होणारे प्रयत्न हा खरा या दीपोत्सवाचा आश्‍वासक संदेश आहे.
या दिवाळीला तिच्यासारखांच तेजाळ, देखणा निरोप द्यायलाच हवा, तिच्यासाठी कृतज्ञता तर व्यक्त व्हायलाच हवी.

सगळ्यांची मनं ज्योतिर्मय
करुन निघाली आहेस…
दिलंस ते भरभरून दिलंस तू… जगण्याची ओढ
जिवंत ठेवली आहेस तू.
जगण्याची लढाई जिंकायला तेजोबल, प्रकाश
दिला आहेस तू…
एकमेकांना भेटवलं आहेस तू…
मनामनातला अंधार
मिटवला आहेस तू.
लख्ख प्रकाश भरला
आहेस तू आमच्यात.
सगळ्या पायवाटा
स्वच्छ केल्या आहेस तू…
न मागताही भरपूर
दान दिलं आहेस तू.

– वृषाली पंढरी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)