आज महाराष्ट्र बंद…

शांतता व अहिंसेच्या मार्गाने बंद करण्याचे आवाहन
औरंगाबाद – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने म्हणजेच आज 9 ऑगस्ट रोजी “महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचे निमीत्त साधून मराठा आरक्षणासाठी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला बंदमधून वगळण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाची सुरूवात दोन वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट या क्रांती दिनी झाली होती. मराठा समाजाने दोन वर्षांत 58 मोर्चे शांततेत काढले. तरीही सरकार दखल घेत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गुरूवारी क्रांती दिनी महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र दोन दिवसांपासून बंदविषयी संभ्रम निर्माण केला होता. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादेतील विंडसर कॅसेल हॉटेलमध्ये बुधवारी राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुंबई, ठाणे पसिरातील समन्वयकांशीही भ्रमणध्वनीवर संवाद साधण्यात आला.

-Ads-

या बंदमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाणार नाही. अहिंसेच्या मार्गाने बंद पुकारण्यात येत आहे. वैद्यकीय, वाहतुक, ऍम्ब्यूलन्स, शाळेची बस अशा अत्यावश्‍यक सेवा बंद करण्यात येणार नाही. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, अशा पद्धतीचे वर्तन मराठा क्रांती मोर्चाकडून होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी आमच्या न्याय मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी समन्वयकांनी केले.

15 ऑगस्टला “चुलबंद’ आंदोलन
मराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंद, 10 ऑगस्टनंतर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलनात जाळपोळ, हिंसा करतो असा आरोप राज्यकर्त्यांनी लावला असल्यामुळे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला स्वत:लाच आत्मक्‍लेश करून घेण्यासाठी चुलबंद आंदोलन केले जाणार असल्याचेही समन्वयकांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)