आजी-माजी मंत्र्यांच्या नगरसेवक भेटीच्या चर्चेला उधाण

आगामी निवडणुकांमधील भुमिका महत्त्वाची

सुनिता शिंदे

कराड, दि. 13 (प्रतिनिधी) – कराड पालिकेत नगरसेवकांना हाताशी धरुन पदवीधर व विधानसभेची तयारी आजी-माजी मंत्र्याकडून सुरु आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ना. अतुल भोसले यांच्या मदतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणाऱ्या नगरसेवकांना विकासाचा मुद्दा पुढे करत हाताशी धरण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात आल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपच्या चौघा नगरसेवकांची भेट घेवून सलगीचा प्रयत्न केला. यामुळे शहरात तुझ्या गळा-माझ्या गळाच्या चर्चेला शहरात सध्या उधाण आले आहे.
कराड पालिकेत पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणाऱ्या जनशक्‍ती आघाडीचे 16, लोकशाही आघाडीला 6 व भाजपचे 6 नगरसेवक आहेत तसेच नगराध्यक्ष भाजपचाच आहे. शिवाय तीनपैकी दोन अपक्षांनी भाजपाला साथ दिली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा व पदवीधर संघाच्या निवडणुकीमुळे सर्वच पक्षांनी नगरसेवकांशी सलगी वाढवली आहे. ना. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या महिन्यात जनशक्‍ती आघाडीच्या नगरसेवकांनी शहर विकासाचा मुद्दा पुढे करत भेटी घेण्याचा प्रयत्न केला. ना. अतुल भोसले यांनीही जनशक्‍तीच्या नेत्याला हाताशी घेवून मुंबईवारी केली.
ही बाब पृथ्वीराज चव्हाण यांना खटकली. त्यांनीही भाजपाची चाल उलटवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपचे अपक्ष उमेदवार असलेले इंद्रजित गुजर यांच्याशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न आमदार चव्हाण यांनी सुरु केला. त्यांनीही बाबांसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत त्यांचे नेतृत्व स्विकारल्याचे अप्रत्यक्षरित्या जाहीर केले. स्व. आनंदराव चव्हाण व स्व. प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासही नगरसेविका स्मिता हुलवान व नगरसेवक राजेंद्र माने वगळता इतर नगरसेवकांची अनुपस्थिती सर्वांच्या दृष्टीस पडली. हा कार्यक्रम उरकून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपच्या नगरसेवकांच्या भेटी-गाठी घेतल्या. या भेटी-गाठीची चर्चा सध्या शहरभरात सुरु आहे. आजी-माजी मंत्र्यांच्या सलगी वाढविण्याचा प्रयत्न सुरु असला तरी नगरसेवकांच्या मनाचा ठाव मात्र कोणालाच घेता आलेला दिसत नाही. विधानसभा निवडणुकीतूनच त्याचा प्रत्यय प्रत्यक्षरित्या दिसेल.

सौरभ पाटील यांची उपस्थिती चर्चेची

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे नगरसेवक सुहास जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी अपक्ष पण भाजपाला पाठिंबा दिलेले नगरसेवक इंद्रजित गुजर, फारुक पटवेकर हेही उपस्थित होते. सुहास जगताप यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याचे कारण पुढे करत बाबांनी त्यांची भेट घेतली. खरी पण त्यांचे मूळ कारण हुशार कराडकरांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी उपस्थित असणारे लोकशाही आघाडीचे सौरभ पाटील हेही सर्वांच्या खुमासदार चर्चेचा विषय बनले आहेत. भाजपाच्या नगरसेविका अंजली कुंभार यांच्याही निवासस्थानी भेट दिल्या.

तेच नगरसेवक वळले भाजपाकडे

गत विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचारकार्यात पुढाकार घेतलेले व पालिका निवडणुकीत निवडून आलेले तेच नगरसेवक या वेळेस भाजपाकडे वळले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत चव्हाण बाबांबरोबर दिसणारे नगरसेवक अतुलबाबांच्या प्रचारात पुढाकार घेतलेले दिसतील. परंतु आमदार चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे जुने जनशक्‍तीचे नगरसेवक हे अजूनही त्यांचेच नेतृत्व मानत असून त्यातील काहींनी तसा खुलासाही अनेक वेळा केला आहे. त्यामुळे चव्हाण बाबांना जुन्यांची भिती नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)