आजी-आजोबांनीही संयमाने घ्यावे

लहान मुलांना वाढवताना अनेकदा आजी-आजोबांचे वागणे महत्त्वाचे ठरते. ही मुले लाडाने बिघडणार नाहीत, हे पाहावे लागते. आई-वडील आणि आजी-आजोबा एकत्र असतील तेथे सर्वांचेच वागणे जबाबदारीचे आणि महत्त्वाचे ठरते, असे दिसून आले आहे.

आठ वर्षांच्या काजलची आई व वडील स्वतःहून वेळ घेऊन भेटीसाठी आले होते. आल्यावर त्यांनी स्वत:ची व थोडी कुटुंबाची म्हणजे कौटुंबिक पार्श्‍वभूमीची ओळख करून दिली. काजलचे वडील एका खासगी कंपनीत बऱ्याच मोठ्या हुद्यावर काम करत होते. आई पूर्वी एका छोट्या कंपनीत कामाला होती, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी करणं या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं अवघड जाऊ लागल्याने तीन वर्षांपूर्वी त्यांनी ही नोकरी सोडून दिली. त्यांच्या घरात काजल तिचे आई-वडील आणि आजी-आजोबा असे 5 जण होते.

“आजी आजारी असल्याने अंथरुणावरच असते. सासूबाई आणि माझं कधीच पटलं नाही. आमचे नेहमी वाद होतात. मी काही केलेलं सांगितलेलं त्यांना कधीच पटत नाही मी विरुद्ध आजी-आजोबा असा वाद नेहमीच काजल पाहात आली आहे. मी काजलला रागावले, शिक्षा केली तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. मी रागावले की ते लगेच तिला जवळ घेतात. तिचे लाड करतात, हट्ट पुरवतात. हा सुद्धा असंच करतो. सतत मीच चुकीचे आहे असं चित्र तिच्यापुढे उभं राहतं. त्यामुळे आता तिलासुद्धा माझी किंमत राहिली नाही. ती एवढी लहान असूनसुद्धा वाट्टेल तसं बोलते.

हल्ली हल्ली तर खोटं सुद्धा बोलायला शिकलीये खूप हुशार आहे, पण काही करायचं नसतं. तिला नुसता आजी-आजोबांबरोबर टी. व्ही. पाहात बसायचं जरा रागावलं की मोठमोठ्यांदा रडायचं. लगेच आजी आजोबा जवळ घेऊन तिचे लाड करणार की मग काय झालंच सगळं तिच्या मनासारखं. प्रत्येक वेळी तिच्या नजरेत आईच वाईट, याला किती समजावलं पण हा काही बोलत नाही. सोडून दे, दुर्लक्ष कर अशी उत्तरं देतो. किंवा मग तिला मारतो. त्यामुळे पुन्हा मीच वाईट ठरते. कंटाळा आलाय मला सगळ्याचा.”

एवढं बोलून त्या थांबल्या, रडायला लागल्या, हे सारं बोलताना त्याचा आवाज खूप वाढला होता. त्या खूपच चिडल्या होत्या. त्यांना राग अनावर झाला होता. त्यामुळे त्यांना शांत होऊ दिलं. त्या शांत झाल्यावर त्यांच्याकडून तसेच त्यांच्या पतीकडून इतर आवश्‍यक माहिती घेतली. काजलच्या वर्तन समस्यांबाबत अधिक सविस्तरपणे जाणून घेतलं व त्यांना पुढील सत्रात काजलची काही निरीक्षणे करून येण्यास सांगितले.

पुढील 2/3 सत्रात झालेल्या चर्चेतून असे लक्षात आले की, काजलच्या आई-वडिलांचा 10-12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. बरेच प्रयत्न केल्यानंतर त्यांना ही मुलगी झाली. त्यामुळे अर्थातच सुरुवातीला तिचे खूप लाड झाले, पण ती मोठी झाल्यावर आईने शिस्त लावायला सुरुवात केली. जे आजी आजोबांना आवडत नव्हतं. तिला रागावलं, मारलं किंवा शिक्षा केली तर त्यांना राग यायचा आणि मग त्यांच्यात वाद व्हायचे. हे ती लहानपणापासून पाहात होती. त्यातच काजलच्या आईचा स्वभाव खूपच तापट होता. त्यामुळे त्यांना पटकन राग यायचा, त्यांचा आवाज चढायचा आणि अनेकदा काजलवर हातही उचलला जायचा. अनेक गोष्टी तिला जबरदस्तीने करायला लावल्या जायच्या.

त्यामुळे तिला आईचा राग यायचा आणि मग ती मुद्दाम त्रास द्यायची, हट्ट करायची, आई रागावली की आजी आजोबांकडे जायची. तिथे तीचं सगळंच म्हणणं मान्य व्हायचं. या अशा दोन टोकाच्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे किंवा दोन टोकाच्या शिस्तीच्या प्रकारामुळे आणि त्याचबरोबर घरातले वाद विवाद, भांडणे यामुळे काजलच्या वागण्यात या वर्तन समस्या निर्माण झाल्या होत्या. तिच्या मनातील आईबद्दलचा राग वाढतच चालला होता. तिच्या या समस्येमागे कौटुंबिक वातावरण, नातेसंबंधातील सततचा तणाव आई तिला वाढवण्याबाबतच्या मतांमधील, विचारांमधील टोकाची विसंगती कारणीभूत होती.

या समस्येची जाणीव कुटुंबातील सर्व सदस्यांना होणे आवश्‍यक असल्याने पुढील काही सत्रात आई-बाबा व आजोबांना एकत्र बोलावून कुटुंब समुपदेशन करण्यात आले. तिच्या वर्तन समस्या कमी होण्यासाठी सगळ्यांमध्ये एकमत असणे, शिस्तीचा समान प्रकार असणे, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, तिच्यासमोर वारंवार होणारे वाद टाळणे यासाठी प्रत्येकाने काय प्रयत्न करायला हवेत याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. अपेक्षित बदल होण्यास थोडा वेळ लागला पण हळूहळू ते बदल झाले. त्यामुळे काजलच्या वागण्यात होणारे बदलही त्यांच्या लक्षात यायला लागले व हळूहळू काजलच्या समस्यांची तीव्रता कमी होत गेली.
(नावे बदललेली आहेत)

मानसी चांदोरीकर, समुपदेशक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)