आजपासून मिळणार एकवेळच पाणी

काही भागांत पाच तास तर काही ठिकाणी तीन तास पुरवठा 

पुणे – खडकवासला धरणातून महापालिकेस यंदा फक्‍त 11.50 टीएमसीच पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून शहरात पाणी कपात लागू होत आहे. त्याचे वेळापत्रक महापालिकेने पूर्वीच जाहीर केले असून त्यानुसार काही भागात 5 तास तर काही भागात 3 तासच पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना जुलै-2019पर्यंत पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाणी कपातीमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन गेल्या तीन दिवसांपासूनच प्रशासनाने पाणी कपातीची रंगीत तालीम केली. त्यात शहरातील अनेक भागांच्या पाणी पुरवठा वेळेत दोन दिवस आधी कपात करण्यात आली आहे.

खडकवासला धरणात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10 टक्के कमी पाणीसाठा आहे. त्याच्या नियोजनासाठी बोलविलेल्या बैठकीत महापालिकेस संपूर्ण वर्षभरासाठी प्रतिदिन 1,150 एमएलडी पाणीच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर महापालिकेस शहरासाठी प्रतिदिन 1,350 एमएलडी पाण्याची गरज आहे. तर हे जादा 200 एमएलडी पाणी देण्यास पाटबंधारे विभाग तयार नसून ते हवे असल्यास पालिकेस दरवर्षाला तब्बल 85 कोटींचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात पाणी कपातीचे नियोजन केले असून ही कपात सोमवारपासून लागू केली जाणार आहे. परिणामी, काही उपनगरांत दिवसाआड पाणी देण्यात येणार असून काही भागात दोन दिवसानंतर पाणी पुरवठा केला जाणार असल्याने वेळापत्रकात म्हटले आहे.

पाण्यासाठी रात्र काढावी लागणार जागून
महापालिकेच्या नवीन वेळापत्रकानुसार नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार आहे. त्यात स्वारगेट पाणीपुरवठा केंद्राअंतर्गत दत्तवाडी- सायंकाळी 5 ते रात्री 10, बिबवेवाडी- रात्री 10 ते 1, भोसले नगर- रात्री 10 ते 2, जनवडी-गोखलेनगर- सायं. साडेचार ते रात्री 11, बाणेर-बालेवाडी-रात्री 10 ते 1, औंध-पहाटे 4 वा., बोपोडी, येरवडा, नगररस्ता भागात पहाटे पाण्यासाठी नागरिकांना रात्र जागून काढावी लागणार आहे. तर हांडेवाडी, कोंढवा, हडपसर, महमंदवाडी भागात नागरिकांना दिवसाआड पाणी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)