आजचा तरुण आणि राजकारण

तरुणाईचा आणि राजकारणाचा सहवास खूप जुना पण एका नव्या विचाराने, नव्या जोमाने येणारी ही नवीन पिढी आज राजकारणाला खऱ्या अर्थानी बदलू पाहत आहे. पण खरच चित्र बदलतंय का? याचा थोडा उहा-पोह…

मी आजचा भारतीय तरुण! हातात Dgree आहे; पण नोकरी नाही. मी चळवळीत उभा आहे… पण चळवळ कसली? का? हे मला ठाऊक नाही. आंदोलनाचे मुद्दे मला पटोत अगर न पटोत, हातात माझ्या झेंडे! पाठीवर पोलिसांचे दांडके पण माझ्याच! नेत्याचा हेतू मला कळो न कळो, त्याच्या सभांना मी गर्दी करणार! त्यांनी दोस्त म्हणून खांद्यावर हात ठेवला, म्हणजे माझं आयुष्य फळणार! होय! मी आजचा भारतीय तरुण!

अन दोष का फक्त ह्या राजकारण्यांचा?
नाही! खरं तर दोष आपला सर्वांचाच. आपण आपल्या डोळ्यावर झापड बांधून जगतोय. स्वतःच स्वतःची फसवणूक करून घेतोय. ‘भारत हा अनुयायांचा देश आहे’ आणि आजही आपण डोळे बंद करून अनुयायी होऊन त्या गर्दीचा भाग होतोय. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीने आपल्याला आंबेडकर, गांधी, टिळक नाही तर त्यांचे विचार दिले. पण नेहमीप्रमाणे आपल्याला हवेत पुतळे! प्रसंगी फुलहार घालून उत्सव करायला अन प्रसंगी चपलांचे हार टाकून दंगली करायला. आपल्याला हवेत नेते, चुकांचे खापर त्यांच्या डोक्‍यावर फोडायला. आपण फक्त जमाव बनवण्यात त्यांची मदत करतोय प्रत्येक सक्रिय कार्यकर्ता हा उच्च महत्वकांक्षा असलेला राजकीय नेता असतो; अस वाचल होतं. पण आपली उडी फक्त इतरांची खुशमस्करी करण्यापर्यंतच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रस्थापित राजकारण्यांचा दोष?
‘शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात’ ह्या मनोवृत्तीतून आपल्यातून कुणी पुढे येत नाही. आपण प्रश्‍नच विचारत नाही. कारण प्रश्‍न करायला आपल्याच संकल्पना अजून स्पष्ट नाहीत. आपण कोणत्या बदलाची आशा करतोय? कोणत्या उद्याच्या भारताची स्वप्न पाहतोय? आणि का खरच ह्या राजकीय नेतृत्वाची लायकी आहे आपली ती स्वप्न पूर्ण करण्याची? हे सारे प्रश्‍न आज आपणच स्वतःला विचारले पाहिजेत. प्रवाहासोबत वाहत जाण्याची वृत्ती बदलण्याची अत्यंत गरज आहे. इतिहास आपोआप घडत नसतो, तो घडवावा लागतो. संपूर्ण पिढी जेव्हा एका विचाराने भारावून जाऊन एकत्र येउन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देते. तेव्हाच क्रांती घडून येते. निदान आतातरी हे अंधपणाने अनुयायी होणं, झेंडे घेऊन सभेला गर्दी करणं आपण थांबवणार आहोत का? आतातरी मुल्यांची, विकासाची लढाई आपण लढणार आहोत का? कुणाचीतरी चमचेगिरी करण्यापेक्षा, डोळसपणे समाजाच्या आणि पर्यायी स्वतःच्या विकासासाठी उभे राहणार आहोत का? हा सवाल आपण सर्वांनी स्वतःला विचारायची गरज आहे.

– भगवान केशव गावित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)