आचारसंहितेपूर्वी भरती पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांची धावाधाव

विद्यापीठाकडून 87 वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांची बिंदूनामावली तपासणी पूर्ण

– डॉ. राजू गुरव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून पुणे विभागातील कला, वाणिज्य, विज्ञान व विधी या एकूण 117 पैकी 87 वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांच्या शिक्षक पदांच्या बिंदूनामावलीच्या (रोस्टर) प्राथमिक तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

राज्य शासनाने 40 टक्‍के सहायक प्राध्यापकांची रिक्‍त पदे भरण्यावरील निर्बंध उठविलेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांची धावाधाव सुरू झालेली आहे. उच्च शिक्षण सहसंचालकांकडून विषयांचा कार्यभार तपासून घेतल्यानंतर बिंदूनामावली तपासणीचे काम पूर्ण करून घेणे महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बिंदूनामावली तयार करून ती तपासणी करण्यासाठी महाविद्यालयांकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत.

विद्यापीठाच्या आरक्षण कक्षांनी अनुदानित बिंदूनामावली तपासणी करण्यासाठी 8 ते 12 जानेवारी दरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक या भागातील महाविद्यालयांसाठी हे तपासणीचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले होते. या कालावधीत पुण्यातील एकूण 49 पैकी 31, नाशिकमधील एकूण 39 पैकी 34, अहमदनगरमधील एकूण 29 पैकी 22 महाविद्यालयांनी बिंदूनामावलीच्या नोंदवह्या दाखल करून तपासणी पूर्ण करून घेतली आहे. उर्वरित महाविद्यालयांच्या तपासणीचे कामकाजही सुरू आहे, अशी माहिती विद्यापीठातून मिळाली आहे.

विद्यापीठाच्या आरक्षण कक्षात महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची गर्दी वाढू लागलेली आहे. बिंदूनामावली तयार करण्यापासून ते इतर सर्व बाबींची माहिती अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना देण्यात येत आहे. शासनाच्या नियमानुसारच तपासणी पूर्ण केली जात असून नियमबाह्य कोणतेही काम करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. विद्यापीठाकडून प्राथमिक तपासणी पूर्ण झालेल्या महाविद्यालयांनी आता शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडे अंतिम तपासणीसाठी धाव घेतली असल्याचे आढळून येत आहे.

राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था 26 व अल्पसंख्याक महाविद्यालये 13, अशा एकूण 39 संस्थांची बिंदूनामावली विद्यापीठाकडून तपासली जात नाही. मुंबई येथील राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी पूर्ण केली जाते.

आता विनाअनुदानित महाविद्यालयांसाठी शिबिर सुरू
आता विद्यापीठाकडून विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांच्या बिंदूनामावली तपासणीसाठी 21 जानेवारी 2019 पासून स्वतंत्र विशेष शिबिर सुरू करण्यात आलेले आहे. येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत हे शिबिर सुरू ठेवण्यात येणार आहे. पुणे शहरासाठी 29 जानेवारीपर्यंत, पुणे ग्रामीणसाठी 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, नाशिकसाठी 6 ते 9 फेब्रुवारी, अहमदनगरसाठी 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत शिबिर होणार आहेत. विद्यापीठाकडून प्राथमिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या मागासवर्गीय कक्षातील सहायक आयुक्‍तांकडून तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. यानंतरच भरतीची पुढील कार्यवाही महाविद्यालयांना करता येणार आहे, असे विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)