आचारसंहितेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई

पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांचा इशारा

मंचर- लोकसभा निवडणूक काळात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गावात कोणीही भांडणतंटा करु नका. तसेच गावात यात्रा, निवडणूक काळात फलेक्‍स, बॅनरबाजी करु नये. गाव बॅनरमुक्त करावे, अन्यथा आचारसंहितेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गावभेटी दरम्यान आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे बोलत होते. यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विनोद गायकवाड, सुनील शिंदे, पोलीस पाटील संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, सरपंच संगिता शिंदे, उपसरपंच राजेंद्र शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कल्याण शिंदे, माजी सभापती आनंद शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद भोर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले की, लग्नसराई, निवडणुकीत डीजे वाजवू नयेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या डीजे मालकावर कारवाई केली जाईल. गावात एखादा विक्रेता आल्यास त्याच्याकडुन ओळखपत्राची मागणी करावी. गावातील भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी. गावात रात्रीच्या वेळी होणाऱ्या घरफोड्या, दरोडे टाळण्यासाठी तरुणांनी गस्त पथके तयार करावीत, त्यासाठी मंचर पोलीस ठाण्याकडून सहकार्य दिले जाईल. 18 वर्षांपेक्षा कमी असलेले मुले-मुली पळुन जातात. मोबाईलच्या अतिवापरामुळे हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आई-वडीलांनी मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी दखल घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पोलीस पाटील संतोष शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)