आघाडीची वाट आता बिघाडीकडे ; कॉंग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार 

 केडगावचा वचपा काढला 

नगर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांची राजकीय समिकरणेच बदलली आहेत. ऐनवेळी निश्‍चित केलेल्या उमेदवारांनी अन्य पक्षात उड्या मारल्याने पक्षांना उमेदवार आयात करून उमेदवारी बहाल करावी लागली. चार दिवसापूर्वीच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीवर शिक्‍कामोर्ताब करून जागा वाटप देखील जाहीर केले होते. परंतू आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आघाडीची वाट बिघाडीकडे चालल्याचे दिसून आले आहे.

-Ads-

जागा वाटपात कॉंग्रेसला 22 तर राष्ट्रवादीला 40 जागा देण्यात आल्या असतांना राष्ट्रवादीने 46 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एवढेच नाही तर काही प्रभागात अपक्षांला पुरस्कृत करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपडले आहेत. परिणामी चार दिवसात आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

महापालिका निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्यानंतर ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन्ही कॉंग्रेसची आघाडी, शिवसेना, भाजप अशी तिरंगी लढत होण्याचे परवापर्यंत वाटत होते. परंतू उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या तिरंगी लढतीला खो बसला आहे. उमेदवारी नाकारून केडगावमधील कॉंग्रेसच्या पाच उमेदवारांनी भाजपत प्रवेश केला व भाजपची उमेदवारी स्वीकारली. हे अपेक्षित झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्‍का बसला आहे. त्यानंतर लगेच राजकीय गणिते बदलली.

राष्ट्रवादीकडून जे प्रभाग कॉंग्रेसला देण्यात आले आहे. त्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करून त्याला पक्षाचा एबी फार्म देखील देण्यात आला आहे. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना कोणला पक्षाचा एबी फार्म दिला हे देखील कळण्यास मार्ग नव्हता. आदेश आला त्याला एबीफार्म दिला गेला. त्यामुळे आज बहुतांशी प्रभागात कॉंग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे ठाकले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार अस्वस्थ झाले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रभाग क्रमांक 1, 4, 7, 11, 12, 13, 14, 15 या आठ प्रभागातील सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 9 व 10 मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार दिले असून उर्वरित प्रभाग क्रमांक 2, 3, 6, 8 या प्रभागामध्ये प्रत्येकी 2 उमेदवार दिले आहेत. अर्थात आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला 43 जागा देण्यात आल्या आहे. त्यात तीन जागा कम्युनिस्ट पक्षाला देण्यात आल्या आहे. त्यानुसार कम्युनिस्ट पक्षाने आपले उमेदवार दिले आहेत. तीन जागांवर कम्युनिस्ट पक्षाने उमेदवार दिले आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीकडून 49 जागांवर उमेदवार दिले गेले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या विरोधात तब्बल 6 उमेदवार जास्त देण्यात आले आहेत. ज्या प्रभागात कॉंग्रेसचे वर्चस्व आहेत. त्या प्रभागात राष्ट्रवादीने उमेदवार देण्याने कॉंग्रेसची अडचण झाली आहे. राष्ट्रवादीने कॉंग्रेसचा केडगावाचा वचपा काढला आहे. कॉंग्रेसने दिलेला धोका राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. त्यात राष्ट्रवादी आणखी काही उमेदवार पुरस्कृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

आता कॉंग्रेस देखील अपक्षांची मदत घेवून राष्ट्रवादीला शह देण्याची तयार सुरू केली आहे. ज्या प्रभागात राष्ट्रवादीचे सक्षम उमेदवार आहे. त्यांच्या विरोधात प्रभावी असलेल्या अपक्ष उमेदवाराला ताक देण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आघाडी आता केवळ नावालाच राहणार असल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
4 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)