आघाडीचा निर्णय झाला, पण पुण्याच्या जागेविषयी चर्चा नाही

पृथ्वीराज चव्हाण : नोटाबंदीच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे; परंतु पुण्याची जागा कोणी घ्यायची याविषयी चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.

नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली. त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले त्यासाठी चव्हाण पुण्यात आले होते.

लोकसभेच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाली असून, त्यामध्ये राज्यात काही जागांची निश्‍चिती करण्यात आली आहे. काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. पुण्यातील जागेबाबत अजून निर्णय झाला नसल्याचे चव्हाण म्हणाले.

यासाठी दि. 15, 16 आणि 17 नोव्हेंबरला बैठक होणार असून, त्यात जागांबाबत चाचपणी होणार आहे. त्यानंतर कोणी किती जागा घ्यायच्या याबाबत निर्णय होईल, असे चव्हाण यांनी नमूद केले.

2014 च्या निवडणुकीत आघाडी झाली नाही, म्हणूनच आमचे सरकार आले नाही. आघाडी असती तर आमचे सरकार कायम राहिले असते, अशी कबुली चव्हाण यांनी दिली. परंतु आघाडी का झाली नाही हे मलाही अजून समजले नाही, असे उत्तर देत त्यांनी प्रश्‍नाला बगल दिली. कोणतीही जागा दोन्ही पक्षांपैकी कोणालाही गेली तरी त्यांचे काम करायचे, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत असेही चव्हाण म्हणाले.

“एमआयएम’ला सोबत घेणार नाही
प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेण्याची आमची तयारी आहे; परंतु “एमआयएम’ला आम्ही सोबत घेणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. आंबेडकर चर्चेला तयार असतील, तर आम्हीही सकारात्मकतेने त्यांच्याशी चर्चा करू, असे चव्हाण यांनी नमूद केले.

“अवनि’चा फेक एन्काऊन्टर
“अवनि’ वाघिणीची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. तिचा “फेक एन्काऊन्टर’ करण्यात आला असून, हे सरकार अशा गोष्टींसाठी “फेमस’ आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. “अवनि’ला जेरबंद करून ठेवता आले असते. हा निर्णय कोणत्या पातळीवर झाला आहे याची चौकशी व्हावी, या प्रकरणात मंत्री दोषी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

नावे बदलून शहराचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न
विकासाचा मुद्दा फसला आहे. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार सरकारला घ्यावा लागत आहे. शहराच्या नामांतरणाचा विषय हा त्यापैकीच एक आहे. इतिहास पुसण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. परंतु काहीही केले तरी भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, असे चव्हाण यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)