आगामी निवडणुकांत भाजपचा पाडाव

खा. राजू शेट्टी : शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवेल, त्यांनाच साथ देणार

फलटण – सध्या पाच राज्यांच्या निवडणूका सुरू असून यात भाजपाचा सपशेल पाडाव होणार आहे. लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर भाजप वगळून इतर सर्व पक्षांची महाआघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, जे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवतील, हमी भाव देईल, शेतकऱ्यांचे कर्ज माफी देतील, त्या पक्षासोबत आम्ही राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फलटण येथीन शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, रवींद्र घाडगे आदी उपस्थित होते. खा. शेट्टी म्हणाले, भाजपा सरकारने सर्वच बाबतीत जनतेचा अपेक्षाभंग केला असून विकासाच्या बाबतीत देश मागे पडला आहे. त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या परिश्रमाला ते मातीमोल किंमत देत आहेत. दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत असून राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपये अनुदान देण्याबाबतही चालढकल चालवली आहे. खाजगी दूध संघ दूध उत्पादकांना अनुदान वगळून पैसे देत आहेत. अनुदानाचा चेंडू सरकारकडे असून शेतकऱ्यांच्या भावनाशी त्यांनी खेळू नये. अनुदानाचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कार्यवाही होण्यासाठी दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. खा. राजू शेट्टी पुढे म्हणाले, पाचपैकी तीन राज्यांत भाजपची सत्ता आहे. तेथील सरकारचा अनुभव जनतेने चांगलाच घेतलेला आहे. त्यामुळे जनता परिवर्तनाच्या शोधात आहे.

तेलंगणामध्ये भाजपचे अस्तित्व नसल्याने भाजप निवडून येण्याचा प्रश्‍नच येत नाही. अशीच अवस्था मिझोरामची आहे. इतर तीन राज्यात राष्ट्रीय कॉंग्रेसने भाजपापुढे चांगले आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या राज्यात राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष सहज आघाडी घेत सत्ता मिळवेल. आगामी लोकसभा निवडणुकासाठी भाजपा वगळता इतर सर्व पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवेल, हमीभाव देईल, कर्ज माफ करेल, अशा पक्षांबरोबर आम्ही राहणार आहोत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे. मागील 2014च्या लोकसभा निवडणुकावेळी खा. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वाना एकत्र आणण्याचा प्रयोग केला होता. तसाच प्रयोग आम्ही यशस्वी करून भाजपाविरुद्ध एकत्रित मोट बांधून भाजपचा पाडाव करू. कोणी किती जागा लढवायच्या यावरही चर्चा होईल. जागा वाटपाबाबत मतभेद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यू फलटण शुगर्सच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची मागणी
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या थकित बिलासंदर्भात बोलताना खा. शेट्टी म्हणाले, यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याशी आपण चर्चा केली असून कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून मागील हंगामात ऊस दिलेल्या उस उत्पादकांना त्यांचे पैसे प्राधान्याने देण्याची आपण मागणी केली आहे. प्रत्यक्ष लिलावातून किती पैसे येतील हे आता सांगता येत नसले तरी पहिले प्राधान्य शेतकऱ्यांचे पैसे देण्यास प्राधान्य राहील. आपण बारकाईने कारखान्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. असे शेट्टी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)