आगवणे प्रकरणी दोषी पोलिसांवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री

 निष्पापांवरील गुन्हे मागे घेणार, गरज पडल्यास सीआयडी चौकशी लावणार

कराड : फलटण येथील स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या आंदोलनावर फलटण पोलिसांनी बळाचा वापर केला होता. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी आज कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दिगंबर आगवणे व कार्यकर्त्यां बरोबर घडलेल्या घटनांची माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर रोहिदास आगवणे आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात अधिकार गृहासमोर उपोषणास बसले होते. या काळात त्यांनी आंदोलन संपवण्याच्या पोलिसांच्या हेतू विरोधात आत्महत्येची पूर्वसूचना देत विषाच्या बाटलीतून विष प्राशन केले. यानंतर काही प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. याप्रकरणी 90 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत दहाजणांना अटक करण्यात आलेली आहे.
दिगंबर आगवणे यांच्या पत्नी व पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच दिगंबर आगवणे यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ऍड. नरसिंह निकम, शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर, भाजपचे सुशांत निंबाळकर यांच्यासह फलटण तालुक्‍यातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराड येथील विमानतळावर भेट घेतली. यावेळी आमदार गोरे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संबंधित घटनांची माहिती दिली. . त्यांनी तत्काळ आगवणे प्रकरणात ज्या पोलिसांनी कायदा हातात घेतला, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणात काहीही संबंध नसताना ज्या-ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अशांवर 169 प्रमाणे गुन्हे मागे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे वेळ पडल्यास या प्रकरणाची सीआयडी चौकशी करु, असे आश्वासनही दिले.

-Ads-

अन्यायाची सखोल चौकशी करणार : पंकज देशमुख
फलटण येथील दिगंबर आगवणे यांचे उपोषण पोलिसांनी दबावाचा वापर करीत उधळून लावले, हा आरोप फेटाळून लावत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलिसांनी नियमानुसारच त्यांचे काम केले आहे. उपोषणकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर चाल करुन तुफान दगडफेक केल्यामुळे फलटण शहरचा ठाणेदार तसेच एक महिला पोलीस कर्मचारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावा लागला. आगवणे प्रकरणात एका पोलीस अधिकार्यासह चार पोलीस कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच आगवणे यांनी मागणी केल्याप्रमाणे बोगस टेस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरीही या प्रकरणाची मी सखोल चौकशी करणार आहे, अशी माहिती पंकज देशमुख यांनी कराड येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)