आखाडीला आले अन्‌ मार खाऊन गेले

स्वत:च्याच गाडीत बसताना चोरीच्या संशयातून ग्रामस्थांनी दिला चोप
विरमाडी,  (वार्ताहर) –
पुण्याहून वाई तालुक्‍यातील खडकी येथे मित्रांकडे आखाडी साजरी करण्यासाठी आलेल्या चौघांना उडतरे ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. गंमत म्हणजे स्वत:च्या गाडीत बसून गाडी घेऊन जात असताना गाडी चोरल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडला. त्यामुळे आखाडीला आले अन्‌ मार खाऊन गेले, अशी गत या चार युवकांची शुक्रवारी झाली.
पुणे येथील चौघेजण आपल्या झायलो या चारचाकी गाडीतून वाई तालुक्‍यातील खडकी येथे मित्रांकडे आखाडी साजरी करण्यासाठी आली होते. शुक्रवारी सकाळी हे चौघेजण महामार्गावरील उडतारे गावाच्या उड्डाणपुलाखाली थांबले होते. त्यानंतर खडकी येथील त्यांचा मित्र त्यांना न्यायला आला. त्याने या चौघांनाही आपल्या गाडीत बसवून त्यांची गाडी पुलाखालीच उभी केली. दिवसभर आखाडीची रंगतदार पार्टी झाल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे चौघेही उडतारे येथे उड्डाणपुलाखाली उभी केलेली गाडी घेऊन आनेवाडी टोल नाक्‍याजवळ विरमाडे येथे येऊन थांबले. तोवर उडतारे येथील ग्रामस्थ पुलाखालील झायलो गाडी या चौघांनी चोरुन नेल्याचा कांगावा करत विरमाडे येथे पोहोचले आणि कोणतीही विचारपूस न करता या चौघांना चोप द्यायला सुरुवात केली. नेमकं कोणत्या कारणाने ग्रामस्थ आपल्याला मारत आहेत. हे या चौघाही युवकांना समजेना. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चौघेही बचावासाठी इकडे तिकडे पळू लागले. त्यातील एकजण ज्याच्याजवळ गाडीची चावी होती तो विरमाडे गावच्या विरुद्ध दिशेला पळून गेला. मात्र, तिघाजणांना गावकऱ्यांनी पकडल्यामुळे पळताही आले नाही. मारहाणीचा प्रकार बघून टोलनाक्‍यावर असलेला एका पोलीस कर्मचारीही तिथे आला. गावकऱ्यांनी त्या पोलिसास सांगितले की या युवकांनी गाडी चोरुन आणली आहे. मग पोलिसानेही त्यांना दोन लगावल्या. दरम्यान, ही गाडी आमचीच आहे असे या युवकांकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र, त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवायलाच तयार नव्हते. अखेरीस त्या युवकांना भुईंज पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे गेल्यावर या युवकांनी सर्व हकिकत सांगितली. नंतर खडकी येथील या युवकांच्या मित्राला बोलाविण्यात आले. त्यानंतर या युवकाने हे चौघेही माझेच मित्र आहेत आणि ही गाडी देखील त्यांचीच आहे, असे सांगितल्यावर या चौघांना सोडून देण्यात आले.
दरम्यान, काही कारण नसताना घडलेल्या या प्रकारामुळे खडकी येथील आखाडी पार्टी मात्र या चौघांच्याही कायम स्मरणात राहिल हे मात्र नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)