आकुर्डी रुग्णालयाच्या इमारतीचे काम कासव गतीने

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी दोन मजली जुन्या इमारतीत रुग्णालय असून जागा अपुरी पडत आहे. तसेच, रुग्णालयात विविध वैद्यकीय सुविधांचा अभाव दिसत आहे. नवीन इमारतीचे काम कासवगतीने सुरु असल्याने गैरसोय सहन करण्याखेरीज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पर्याय राहिलेला नाही.

आकुर्डीच्या जुन्या रूग्णालयाच्या परिसराच्या नवीन जागेत पाच मजली रुग्णालयाची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रुग्णांना अद्ययावत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. परंतु, इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन रूग्णालय सुरू होईपर्यंत रूग्णांचे हाल होणार आहेत. सद्यस्थितीत रुग्णालयात प्रसूतीची सोय, बाह्यरुग्ण व जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, फिजिशियन, स्त्री-रोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, कुटुंबकल्याण आणि राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आवश्‍यक सुविधा उपलब्ध आहेत. जागा कमी असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली तर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन कर्मचाऱ्यानांही रुग्णावर उपचार करताना कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी ठराविक आजारांवर उपचार होत असल्यामुळे परिसरातील इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात जावे लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रुग्णालयात डोळे, नाक, कान, घसा, हाडांचे विकार, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम.आर.आय, एक्‍स-रे यासाठी रुग्णांची सोय नसल्याने त्यांना दुसरा पर्याय शोधावा लागतो. तसेच, रुग्णालयासमोरील रस्ता अरुंद आहे. रुग्णालयात येणाऱ्यांसाठी रस्त्याकडेला पार्किंग असल्यामुळे रस्ता अजूनच अरुंद होतो. वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे वाहनांचीही रेलचेल असल्याने तातडीने एखादी रुग्णवाहिका आल्यास लवकर रस्ता मिळत नाही. त्यामुळे, रुग्णांचे हाल होत असून विशेषत: प्रसुतीसाठी महिलांना आणताना मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत.

“”रुग्णालयाच्या जुन्या इमारतीजवळ नवीन इमारतीचे काम सुरू असून ते सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे. त्यासाठी, तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. यामधील, दीड वर्षाहून अधिक कालावधी उलटून गेला असून पुढील वर्षभरात काम पूर्ण होऊन रूग्णांना चांगल्या सुविधा मिळतील,” अशी माहिती स्थानिक नगरसेवक जावेद शेख यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)