आकलन वाढविण्यासाठी वाचन महत्त्वाचे …(भाग एक )

परीक्षा जवळ आल्या आहेत किंबहुना काही वर्गांच्या चालू आहेत. या काळात पालक आपल्या मुलांना “अभ्यास कर’ म्हणून सतत मागे लागलेले पहायला मिळतात. आपला पाल्य कशा पध्दतीने अभ्यास कारतो, ते त्याला कितपत समजते हे पहाणेही महत्त्वाचे ठरते. योग्य पध्दतीने वाचन केल्यास तो विषय पूर्णपणे समजण्यास मदत होते.

“अभ्यास’ म्हणजे नेमके काय? ज्ञान मिळविण्याच्या हेतूने केलेल्या कृतीला “अभ्यास’ असे म्हणतात. सविस्तरपणे पाहिल्यास परीक्षेच्या दिवसांत अभ्यास म्हणजे उजळणी किंवा सराव किंवा पुनरावलोकन असा त्याचा अर्थ आहे. उजळणीमध्ये आकलन, विश्‍लेषण, चिकित्सक विचार आणि स्मरण इत्यादींचा समावेश आहे. उजळणी प्रभावी, परिणामकारक आणि फलदायी होण्यासाठी काही कौशल्य वापरणे आवश्‍यक आहे. बालवयामध्ये पालकांनीच ही कौशल्ये पाल्यांना सांगितली पाहिजे. उजळणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे वाचन होय. सुमारे 75 टक्के ज्ञान हे आपल्याला वाचनामधून मिळते. भाषा, इतिहास, भूगोल व विज्ञान या विषयांच्या उजळणीमध्ये वाचन महत्त्वाचे आहे.

मुले अभ्यासाचे पुस्तक कसे वाचतात, या प्रश्‍नाचा पालक म्हणून आपण कधी विचार केला आहे काय? विशिष्ट हेतूने पुस्तक वाचल्यास विषय लवकर समजतो. उजळणीच्या दिवसात वाचनाचा वेगही अधिक असला पाहिजे. वाचनाचे महत्त्व : वाचन म्हणजे छापलेल्या मजकुराचा अर्थ लावणे. शब्दाचा अर्थ लावताना त्या संबोधाचे पूर्वज्ञान, संबोधातील कल्पना आणि हेतू यांचे आकलन होणे व महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांची गुंफण होऊन विचारसूत्र तयार होणे, याच्या आधारे पुस्तकातील क्रमश: एकेक भाग समजणे याला “वाचन’ म्हणतात. वाचन हे कौशल्य आहे. प्रयत्न करुन ते आत्मसात करता येते, वाढवता येते मुलाची बौध्दिक पात्रता, मानसिक क्षमता, शारिरीक घडण व आजूबाजूचे वातावरण याचा वाचनक्षमतेवर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पडतो.

आकलनः वाचनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आकलन, म्हणजेच वाचलेले समजणे हा होय. आकलनातील पहिला टप्पा म्हणजे शब्दाचा, वाक्‍याचा अर्थ कळणे, नंतर परिच्छेदातील अर्थाची जुळणी करुन त्यातील मध्यवर्ती कल्पना समजणे. आकलन वाढल्यास निष्कर्ष काढणे सोपे जाते.

शब्दसंग्रह : शब्दसंग्रह जास्त असल्यास वाचन, बोधन, आकलन व वाचनाचा वेग वाढतो. पालकांनी मुलांना रोज पाच नवे शब्द अभ्यासायाला सांगावेत. शब्दसंपत्तीमुळे बोलणे आणि लिहिणे या क्रियाही प्रभावी होतात.

  – मीना जाधव 
नालेगाव,मो. 9403943736


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)