आकर्षक नंबरच्या नावाखाली लुटीचा धंदा

नंबरच्या मार्केटिंगसाठी यंत्रणा; साहेबांच्या नावाखाली की साहेबांसाठी लुट?

प्रशांत जाधव

सातारा – वाहनांना आकर्षक नंबर घेण्याचे फॅड वाहन चालकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा लाभ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बसलेले काही सरकारी बाबू अन्‌ दलाल मिळून घेत असल्याचे चित्र आहे.
आकर्षक नंबरचे युवा वर्गात मोठ्या प्रमाणात फॅड आहे. आकर्षक नंबर मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी परिवहन विभागाकडून खास नंबरची यादीच प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार ठराविक नंबरला त्या त्या प्रमाणात सरकारी रक्कम आकारली जाते.

-Ads-

एखादा नंबर घेण्यासाठी नागरिकांची मागणी वाढली, तर त्या नंबरसाठी जो वाहनधारक जास्त रक्कम अदा करेल, त्याला प्राधान्य देण्याचा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नियम आहे. मात्र कोणत्या नंबरला किती बोली लागते यापेक्षा कोणत्या नंबरमधून आपला खिसा भरला जाईल याकडेच काही कारभाऱ्यांचे लक्ष आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आकर्षक नंबर नागरिकांना मिळावा, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षामध्ये आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकाचा हजारो वाहनधारकांनी लाभ घेतला.

त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त महसुलही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मिळतो आहे. मात्र एखाद्या नंबरसाठी मुद्दाम चढाओढ लावायची अन्‌ त्यातून सरकारी महसुलाला खड्डा पाडत स्वत:चा खिसा गरम करायची चटक काही बहाद्दरांना लागली आहे. यासाठी वाहनधारकाला नंबर कसा अन्‌ कधी गेला. अमका तमका “त्या’ नंबरसाठी किती पैसे देत मागे लागला, असे सांगणारी समांतर यंत्रणाच “आरटीओ’च्या बाहेर झाडाच्या सावलीला काम करताना दिसते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना खरच काही महित नाही असे बोलणे जरा धाडसाचेच ठरेल.

हॅन्डलिंग चार्ज म्हणजे काय?
दुचाकीची नोंदणी करताना शासनाचे शुल्क व कर याव्यतिरिक्त कोणताही नवा पैसा वाहनधारकाकडून घेऊ नये, असा आदेश राज्य सरकारने नुकताच काढला आहे. तसेच असे न करण्याच्या विक्रेत्यांना सुचना करण्याचे आरटीओंना आदेश देण्यात आले आहेत. मात्र साताऱ्यात कुंपनच शेत खात आहे. जिल्ह्यात होणाऱ्या वाहन कॅम्पला प्रत्येक दुचाकीधारक 300 रुपये याप्रमाणे विक्रेत्यांकडून हॅन्डलिंग चार्जच्या नावाखाली काही बहाद्दर अधिकारी हिशोब घेत आहेत. परिणामी विक्रेते खरेदीदाराच्या खिशाला चटका लावत आहेत. त्यामुळे हे हॅन्डलिंग चार्ज प्रकरण नेमके काय आहे, असा सवाल उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)