आई!

नरेंद्र नाईक 

नर्मदे! हरहर… अशा गजरात स्त्री आस्तित्वाची रुजुवात झाली अन्‌ पुरुष चक्राचा कास सहन करण्याचं बळ मिळालं. विश्‍वातील नियतीचं दार करकरलं अन वसुंधरा प्रकटली. तशी काळी कपिला हंबरली, वासरू थरथरलं अन विश्‍वमोलाचा माता आविष्कार प्रकटला. इंद्रायणी दुथडी भरून वाहू लागली. कावेरी शरयू नद्या नर्तन करू लागल्या, तर गंगा, यमुना मातृप्रेमाची आराधना आळवू लागल्या. याच मातृप्रेमाने आसेतू हिमालयही आनंदघन बनला. आपलं आरस्पानी सौंदर्य परावर्तित करत आसमंतात एक गहिरा आशय गुंफू लागल्या. तसा अर्णवही खडबडून जागा झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तची आरोळी उठली. या आरोळीची जन्मदात्री होती एक माता! आणि तिचा अचाट हुंकार म्हणजे कोकराच्या अंतर्आत्म्यातील आंतरिक गर्जना. खरंच आई ही काय असते?

एक अंतस्थ, अतर्क्‍य, अथांग विश्‍वाला भिजवणारा भिज पाऊस, घमघमणारा आंतरगंध. मग खरंच आई अत्तरदाणी असते काय? स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. मग आई कुठे असते? अणुरेणूत, का अजून कुठे? अंतर्धान पावलेली पावले शोधण्यासाठी आज मी अधीर झालोय. फिरतोय गल्लीबोळांत, अजिंक्‍य कड्यातही, अगदी अनवाणी होऊन, पण आईची मूस काही हाती लागत नाही. काय ही यातायात? अनादी काळापासून अनमोल रत्नाच्या शोधात फिरणारा एक अनर्वत पण…अनुपम, अनुराग काही कळलाच नाही.

आई आत्म्याची निर्लेप अनुभूती, म्हणजे आदिअंत. तरीही अलक्ष आलाप का छळतो? तमाम मानवजातीच्या अभ्युत्थानासाठी आई म्हणजे एक आत्मीय आनंदकंद अनार. अबादानीच अबादानी. साक्षात आबादीआबाद. पण हा आबाद कुठे असतो? आर्यावर्तात, हिमालयापासून विंध्याद्री पर्वतापर्यंत. आई म्हणजे साक्षात ईला ईलाही. काय हे रहस्य? काय पुरावा? कुणी पाहिला ईलाही? असे असले तरी आई असते एक दिव्याची वात. कधीच टाकत नसते कात. आई असते एक काकड आरती. सांजदिव्यातील सांजवात. मातृगंधाचा कस्तुरी कलश. आई ही कल्पित कथा नव्हे. साक्षात कांचन…. धडाधडा पेटणारा कानन. भगवान महाबुद्धाच्या चेहऱ्यावरील कारुणिक महाप्रसाद! म्हणून ती घरादाराची कमलिनी असते. तिच्या करता काही और पण आई या शब्दाचं कोडं अंगदेशाच्या कर्णाला तरी खोलता आलं का? की भारतीय वीर असणाऱ्या श्रीरामाला खोलता आलं? याचं उत्तर आहे-“नाही.’ आई समजून घेण्यासाठी समजावी लागते गोठ्यातील गाय. तेव्हाच चराचरात दिसतील माय. खरंच सीता, द्रौपदी, दोषी होत्या का? सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली हा इथला इतिहास आणि द्रौपदीला वस्त्रहरणाला सामोरं जावं लगलं हा इथला नग्न इतिहास. त्यामुळेच कन्याकुमारी ते हिंदुस्थानचे दक्षिण टोक आळविते फक्त. नरेन महात्मा व्हावा तर आईचे माहात्म्य जाणणारा. खरंच तिची उतराई करता येईल? पण विवेकानंदांसारख्यांचा अपवाद सोडला तर रामायण-महाभारतापासून धर्मात्म्यांची निरस जिगीषा, कुठला आदरभाव व्यक्त करील? उदात्त आदरभाव व्यक्त करण्यासाठी उधाण वाऱ्यावर स्वार होणारा उन्मत्त पुत्र असावा लागतो. तरच सत्वर आईची महती गाणारं उद्यान हाती लागतं आणि निर्झराचा ओलावा खळखळू लागतो.

पण सध्याची आई भरल्या ओटीने जात आहे काय? ओली भिक्षा मागता मागता तिचे व्याकूळ ओठ निर्जन स्थळी विसावतात. ओहोळ, नदी, नाले हे ही कटबाज होऊन रजेवर जातात, तेव्हा माधुकरी आईचा आर्तस्वर कुठला आधारभूत आयाम देत असेल या विश्‍वाला? आदराचं ठिकाण जेव्हा अवहेलना घेतं तेव्हा अर्धपोटी उसासे आमूलाग्र आघातातून बाहेर झेपावतात. तेव्हाच पृथ्वीचं आवरणही कुठल्या उद्यानात उदय पावलं याचा आतुरतेने विचार करावा लागतो. तरंच आई नावाचं उद्यान फुलवता येईल. त्यासाठी बाप नावाचा बगीचाही तपासावा लागतो.

(नरेंद्र नाईक यांच्या “आई’ या पुस्तकातून साभार) 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)