आई-वडील, समाज वर्तनातून मुलांवर संस्कार घडतात

शेवगाव – मुलांना संस्कार केंद्रात पाठवून वा कोठून बाहेरून ते घडत नसतात. आपल्या आई-वडिलांचे तसेच समाजाचे वर्तन मुले उघड्या डोळ्यांनी पहातात. कानांनी ऐकतात. त्यातूनच त्यांच्या बालमनावर होणाऱ्या परिणामातून संस्कार आपोआप घडत असतात. म्हणूनच आपले वागणे उत्तम असायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणीताई बंग यांनी येथे केले.

येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, रोटरी क्‍लब व इनरव्हिल क्‍लबच्या वतीने डॉ.बंग यांची “तारुण्य भान’ या विषयावर गेली दोन दिवस येथे कार्यशाळा सुरू असून शुक्रवारी रात्री शेवगावाकरांसाठी त्यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आपल्या पाल्याबरोबर आपण कसे वागावे याचा परिपाठच डॉ. राणीताईंनी घेतला. त्या म्हणाल्या, प्रत्येक पालकाला आईवडिलांनाच आपल्या अतृप्त राहिलेल्या इच्छा मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ईर्षा असते. त्या दृष्टीने ती मुलांच्या मागे लागतात. पण प्रत्येकाला क्षमता, कुवत, वेगवेगळी असते. केवळ मार्क म्हणजे हुशारी नसते. मुलाची रूची कशात आहे हे समजून घेतले पाहिजे. दहावी-बारावीच्या परीक्षेच्यावेळी तर मुलांऐवजी जणू पालकांचीच परीक्षा असते असे चित्र सर्वत्र आढळते. असे व्हायला नको. मुलांना स्वातंत्र्य द्या. त्यांच्यावर मालकी हक्‍क गाजवू नका. ईश्‍वराने दिलेल्या मुलांचे आपण विश्‍वस्त आहोत. या भावनेतून त्यांच्याबरोबर वागा. आपल्या मुलाची तर कोणाच्याही मुलांबरोबर तुलनाही करू नका.

आज घरातील सुसंवाद हरपल्याचे चित्र असल्याची खंत व्यक्‍त करून आपली मुले “मेडल मशीन’ नाहीत, याचे भान ठेवा. तसेच गरज असो वा नसो मुलांना मागेल ते दिले म्हणजे आपले कर्तव्य संपले असेही समजू नका. मुलांना नकार पचवायची ताकद नसते. मुलांच्या मित्रमैत्रीणींची माहिती पालकाला हवी. त्यासाठी त्यांच्या समवेत सुसंवाद हवा. या वयात स्वैराचारी जीवनाकडे आकर्षित होण्याचा कल असतो. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजावून त्यांच्यात कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी. खऱ्या प्रेमाची या वयात पारख होणे शक्‍य नसते. केवळ शारिरिक आकर्षण मात्र असते. ते त्यांना समजावणे आगत्याचे आहे.

यावेळी प्राचार्य लक्ष्मणराव मतकर, सचिव डॉ. दिनेश राठी, इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. प्रीती राठी, सचिव वसुधा सावरकर, डॉ. संजय लड्डा, सर्जेराव निंबाळकर, उपप्राचार्य दिलीप फलके मंचावर तर डॉ. गणेश चेके, ऍड. विजय काकडे, प्रा. किसनराव माने, डॉ. मनिषा लड्डा, डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, डॉ. सीमा बिहाणी, डॉ. आशिश लाहोटी, राजश्री रसाळ, राम महाराज झिंजुर्के, तसेच राणीताईंबरोबर आलेले ज्ञानेश्‍वर पाटील, राजेंद्र इसासरे, सुनंदा खोरगडे, यांच्यासह शेवगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप फलके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. माने यांनी केले. भागिनाथ काटे यांनी आभार मानले.

मातृभाषेतूनच खरा विकास

यावेळी डॉ. राणीताईंनी समाजात अलीकडे इंग्रजी शिक्षणाचे खुळ वाढल्याचे सांगून मातृभाषेतूनच खरा विकास होतो. विचाराची प्रगल्भता वाढण्यास वाढण्यास मातृभाषाच उपयोगी पडते. असे अवर्जून सांगताना आपण आपली दोन्ही मुलेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच शिकविल्याचे नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)