आईसह बालकाचा हलगर्जीपणामुळे मृत्यू

डॉक्टरवर आरोप : पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) – हजगर्जीपणे उपचार करून आई व तिच्या बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील संचित हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कामाठीपुरा येथील नागरिकांनी आज शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी समजावून सांगितल्यावर संबंधित डॉक्टरांविरुद्ध तक्रार अर्ज देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दीपाली प्रसाद शिंदे (वय 27) यांचे गोडोलीतील कामाठीपुरा भागातील वैदुवाडी हे माहेर आहे. त्या प्रसूतीसाठी माहेरी आल्या होत्या. पालकांनी तिची नोंदणी गोडोली येथील संचित हॉस्पिटलमध्ये केली होती. तेथे डॉ. अपर्णा जगताप यांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते. 25 डिसेंबरला दीपाली यांना ताप आल्याने रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. जगताप यांनी त्यांना युरीन टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर तपासणीचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगत डॉ. जगताप यांनी ताप कमी होण्याच्या गोळ्या त्यांना दिल्या. तीन दिवस औषधे खाल्ल्यानंतरही त्यांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे 29 डिसेंबरला त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्या वेळी डॉ. जगताप गावाला गेल्याचे सांगत कर्मचार्‍यांनी त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले.
तेथील डॉक्टरांनी दीपाली यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत डॉ. जगताप यांना फोन केला, तसेच पुन्हा त्यांच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. दीपालीला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. जगताप या आधीच येऊन थांबल्या होत्या. त्या वेळी डॉ. जगताप यांनी दीपालीच्या गर्भात असणारे अर्भक दगावल्याचे सांगत रक्त तपासणी करण्यास सांगितले. रक्त तपासणी अहवालात दीपालीच्या शरीरात काविळीचे प्रमाण आढळले. हा अहवाल पाहून डॉ. जगताप यांनी दीपाली यांना मुंबई किंवा पुणे येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी दिरंगाई केल्याच्या कारणावरून नातेवाईकांना सुनावले. तपासणी अहवाल पाहून त्याठिकाणच्या डॉक्टरांनी दीपाली यांना कावीळ झाल्याचे तुम्हाला सांगितले नाही का? असा सवाल केला. दरम्यान, दीपाली यांचा रविवारी (ता. 6) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दीपाली यांच्या मृत्यूस डॉ. जगताप यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत आज दुपारी शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. तेथे मोठा जमाव जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिस निरीक्षक सारंगकर यांनी जमावाशी चर्चा केली, तसेच अशा प्रकारे डॉक्टरांवर गुन्हा दाखल कण्यासाठी कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. त्यानंतर संजीत आप्पाराव गुडिले (रा. वैदुवाडी) यांनी याबाबतचा तक्रार अर्ज सारंगकर यांना दिला. वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सारंगकर यांनी नातेवाईकांना दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)