आईच नावडती होते तेंव्हा…

आपले लाड न करणारी आई लहान मुलांना नकोशी वाटत राहते. घरातले इतर घटक आपले खूप सारे लाड करत असताना कडक शिस्तीसाठी आईच लाड, कौतुक करेनाशी होते, तेंव्हा लहान मुलांचे भावविश्‍व ढवळून निघते. म्हणून सर्वांनी अशा लहानांशी सामोपचाराने वागले पाहिजे, हे लक्षात ठेवावे.

पाच सहा वर्षांच्या तनवीला घेऊन तिची आई जरा वैतागूनच भेटायला आली. आल्यावर बसून तिने आधी पाणी प्यालं. थोडी शांत झाली. मग बोलायला सुरुवात केली. तिने आधी स्वतःची ओळख करून दिली. तनवीची आई एका खासगी कंपनीत काम करायची. तिला सकाळी 10.00 वा. निघायची आणि रात्री 8.00 ते 8.30 वा.पर्यंत परत यायची. ती परत आली की तनवी रोज कशा ना कशासाठी हट्ट करायची. कधी कपडे, कधी शाळेतली काहीतरी वस्तू, कधी खाऊ, तर कधी आणखी काही. रोज भंडावून सोडायची.

-Ads-

आई तिला समजावून सांगायची, रागवायची पण काही उपयोग व्हायचा नाही. ती रडून धिंगाणा घालायची. ती वस्तू मिळेपर्यंत ती खूप त्रास द्यायची. आणि “मला तू आवडत नाहीस तू जा.’ असं चिडून म्हणायची. हे बोलताना मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. रडू आवरणं अवघड गेलं. तिला शांत होऊ दिलं. पण ती इतकी रडत होती की हे सत्र तिथेच थांबवावे लागले. छोटी तनवी आईला रडताना बघून अस्वस्थ झाली. त्यामुळे पुढच्या सत्रास आईला एकटीसच येण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे ती एकटी भेटायला आली. त्याही दिवशी ती अगदी शांत होती. तिने हळूहळू संवाद साधायला सुरुवात केली. तिच्याशी चर्चा करून अधिक माहिती घेतली. या सत्रात तिच्याशी झालेल्या चर्चेतून तनवीची समस्या लक्षात आली. ती म्हणजे तनवी एकत्र कुटुंबात वाढत होती. तिच्या घरात पणजी आजी, आजी-आजोबा, काका आणि तिचं कुटुंब असे बरेच सदस्य रहात होते. ती जेव्हा कामासाठी जायची तेव्हा घरातले इतर सदस्य तिला सांभाळायचे.
तनवीला आजी-आजोबा आणि काकाचा खूप लळा होता. ते तिघे तिचे खूप लाड करायचे.

तिला जे हवे, जसे हवे तसे वागायचे, तिने काही मागितलं की लगेच आणून द्यायचे. त्यामुळे तिचे सगळे हट्ट घरात लगेच पुरवले जायचे आणि तिला ही हट्टीपणाची सवय लागू नये म्हणून आई मात्र तिला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होती. आईचे शिस्त लावणं तनवीला अजिबात आवडत नव्हतं. आईचं समजावून सांगणं तिला अजिबात पटत नसे. आई आपल्याला नाही म्हणते म्हणून तिला आईचा राग येत असे. बाकीचे सर्वजण तिचे हट्ट पुरवत असत आणि आई मात्र शिस्त लावत असे. त्यामुळे ती आईला “तु आवडत नाहीस’ असं म्हणत होती. हे या चर्चेतून तिच्याच लक्षात आले.

तनवीला वाढवताना घरात दोन वेगळी मते होती. आई शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होती. तर बाकीचे मात्र तिचे सर्वच लाड पुरवत होते. त्यामुळे साहजिकच तिला बाकी सगळे आवडायचे. पण आई मात्र आवडत नसे. त्यामुळे ती आईला असा त्रास देत होती. ही समस्या लक्षात आल्यावर यासाठी कुटुंबातील आजी-आजोबा, काका, बाबा या सर्वांबरोबर कुटुंब समुपदेशनाचे सत्र घेण्याचे ठरले. अर्थातच सुरुवातीला घरच्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. पण नाईलाजाने ते चर्चेसाठी आले.

त्यानंतरच्या 2-3 सत्रांत त्या सर्वांनाच तनवीच्या समस्येची, त्यांच्या कारणांची जाणीव करून देण्यात आली व त्यावरील उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रातील मार्गदर्शनानंतर सर्वांनाच या गोष्टीचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी आवश्‍यक बदल करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे हळूहळू तनवीच्या वागण्यात बदल दिसायला लागला आणि तिची हट्ट करण्याची सवय कमी झाली. घरातल्या सर्वांनीच तिला वाढवण्याची एकच शिस्तीची पद्धत वापरल्याने तनवीची समस्या कमी होत गेली.

आपल्या पाल्याला योग्य शिस्त, योग्य वळण लावायचे असेल तर घरातल्या सदस्यांच्या वागण्या बोलण्यात समानता असेल तर तनवीसारखी समस्या निर्माण होणार नाही आणि आपली मुलं हट्टी देखील होणार नाहीत हे नक्की.

(केसमधील नाव बदलले आहे.)

मानसी चांदोरीकर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)