आईची शिकवण जीवनोपयोगीच…

संस्कार

अरुण गोखले

-Ads-

मित्रांनो! अरे आईचे उपकार ते किती आणि कोणत्या शब्दांत सांगायचे? माझ्या आईने माझ्या बालमनांत सु-संस्कारांची रुजवण लहानपणीच केली. लहानपणी मी फार हट्टी होतो. एवढ्या तेवढ्या गोष्टीचा हट्ट करायचो, पण माझ्या आईने मात्र माझे सारे हट्ट नेहमीच पुरविले.
एकदा काय झाले मी आईकडे हट्टच धरून बसलो की आज तूच मला आंघोळ घाल. तेव्हा आई म्हणाली, “श्‍याम! तू काही आता लहान राहिलेला नाहीस. तुझी तुला आंघोळ करता येते ना, मग जा, कर ना.
पण छे… मी काही तयार होईना, अडूनच बसलो की नाही, आज तूच मला आंघोळ घाल. अखेर आई तयार झाली. तिने चुलवणावरचे पाणी काढले. विसाण घालून सारखे केले. देवळीतल्या तांबलीतील तेल माझ्या डोक्‍याला लावले. तेलाचा हात माझ्या अंगावरून फिरवीत म्हणाली, “चला लाडोबा! पटकन आंघोळ करून घ्या.’
मी चटकन जाऊन परसातल्या दगडावर बसलो. आईने कोणताही त्रास कटकट न मानता मला छान आंघोळ घातली. शेवटी “औक्षवंता भाग्यवंता हो…’ असं ही म्हणाली.
मग जवळच्याच एका दगडावर मला उभं करत ती माझं अंग पुसू लागली. त्या प्रेमळ मायेच्या स्पर्शाने मी सुखावू लागलो. “झालं मनासारखं. जा आता घरात,’ ती म्हणाली.
त्यावेळी मी माझा पाय उचलत आणि तिच्यापुढे धरत म्हणालो, अग माझे तळपाय पूस ना. नाहीतर माझ्या ओल्या पायांना माती लागेल आणि मळतील ते. तेव्हासुद्धा तितक्‍याच वात्सल्याने आणि प्रेमाने तिने तळपायही कोरडे केले. मात्र त्यावेळी ती मला म्हणाली, “श्‍याम! तळपायाला माती लागेल म्हणून जेवढी काळजी घेतोस ना, तेवढीच माती मनालाही लागू नये म्हणून काळजी घे हो.’
खरं सांगतो त्यावेळी तिच्या त्या शिकवणीचं तितकं महत्त्व माझ्या बालमनाला कळल नव्हतं. पण पुढे मोठेपणी जेव्हा जेव्हा मन मलिन होण्याचे प्रसंग आले. त्या प्रत्येक वेळी मला तिचं ते वाक्‍य आठवत राहिलं, आणि मी प्रयत्नपूर्वक माझ्या मनाला कुविचारांची माती लागू नये म्हणून काळजी घेत आलो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)