आईकडून मुलीला मातृत्वाचे दान

देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे – देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (युटरस ट्रांन्सप्लॅंट) येथील गॅलेक्‍सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट (जीएलसीआय) रुग्णालयात गुरुवारी यशस्वी झाली. या प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेसाठी तब्बल नऊ तास लागले. दुपारी 12 वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया रात्री नऊ वाजेपर्यंत चालली. सोलापूर येथील 21 वर्षीय तरुणीला तिच्या आईचे गर्भाशय दान केले.

या मुलीला तीन बहिणी आहेत. मात्र, या सर्व आपत्यांमध्ये केवळ त्या तरुणीला जन्मताच गर्भाशय नव्हते. म्हणून तिच्या आईने तिला गर्भाशय दान केले. गॅलेक्‍सी केअर रुग्णालयाचे वैदयकिय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर तसेच डॉ. मिलींद तेलंग यांच्यासह 12 स्त्रीरोगतज्ज्ञांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली आहे. प्रथम तरुणीच्या आईचे गर्भाशय दुर्बिनीद्वारे काढून त्यानंतर ते तरुणीवर प्रत्यारोपित करण्यात आले. दाता महिला आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली तरुणी या दोघी सुखरूप आहेत. तरुणीला पुढील 24 तास डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याच्या पथकातील डॉ. मिलींद तेलंग यांनी दिली. गर्भाशय काढण्यासाठी 4 तास तर प्रत्यारोपित करण्यासाठी 5 तास लागल्याचे त्यांनी सांगितले.
गॅलेक्‍सी केअरकडून तीन महिलांवर हे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. या तीनही महिलांना त्यांच्या आई गर्भाशय दान करणार आहेत. त्यापैकी गुरुवारी एका महिलेवर प्रत्यारोपण झाले. तर दुसऱ्या महिलेवर प्रत्यारोपण शुक्रवारी (दि.19) होणार आहे. तर तिसऱ्या महिलेवर जुनमध्ये होणार आहे. हे सर्व प्रत्यारोपण पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यातील सोलापूरच्या तरुणीला गर्भाशय नव्हते. तर दुसऱ्या महिलेला आशेरमन्स सिंड्रोम नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे ती आई होऊ शकत नाही. तर, तिसऱ्या महिलेला कॅन्सर झाल्याने तिचे गर्भाशय काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)