आंबेलीतील तिहेरी अपघातात पाच जखमी

सिंधुदुर्ग – दोडामार्ग-भेडशी राज्य मार्गावरील आंबेली येथील धोकादायक वळणावर एसटी, डंपर, कार यांच्यात धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी चालक व्ही. पी. बुवा (बेळगाव), वाहक मालिकजान शेख (तुर्केवाडी, चंदगड) तर डंपरचालक कल्पेश धरणे (रा. भेडशी) हे तिघे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले.

दोडामार्गे चंदगडला जाणारी एसटी आंबेली येथील अवघड वळणावर आली असता भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने भरधाव वेगात येणारा डंपर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की या धडकेत एसटी बस मागे सरकून गटारात कलंडली. एसटी बस मागून असलेली चारचाकी या अपघातात एसटी बसच्या खाली सापडली. मात्र मारूती गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तर एसटी चालक व्ही. पी. बुवा, वाहक मलिकजान शेख, प्रवासी सावित्री कदम (पाळये), साटेली भेडशी महसूल मंडळ अधिकारी सचिन गोरे, तर डंपरचालक कल्पेश धरणे असे 5 जण जखमी झाले.

-Ads-

या अपघाताची घटना समजताच तालुक्‍यातील अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, देवा शेटकर, शंकर देसाई, गोपाळ गवस, अरविंद राऊत, प्रवीण गवस, सेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी व अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी म्हापसेकर यांच्या गाडीतून जखमींना दोडामार्ग येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)